शिर्डीतील वादाला नवे वळण; भाजपचे विखे पाटील यांचा ग्रामस्थांच्या भुमिकेला पाठिंबा

सतीश वैजापूरकर
Tuesday, 8 December 2020

साईदर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी सभ्य पोषाख करून यावे, अशा आशयाचे विनंती फलक साईसंस्थानने लावले.

शिर्डी (अहमदनगर) : साईदर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी सभ्य पोषाख करून यावे, अशा आशयाचे विनंती फलक साईसंस्थानने लावले. त्यास भुमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी आक्षेप घेतल्याने वादंग निर्माण झाले. त्यांच्या विरोधात शिवसेना व मनसेची महिला आघाडी आणि ब्राम्हण महासंघाने या वादात उडी घेतली. काल काही ग्रामस्थांनी देखील ठिकठीकाणी लावण्यासाठी हे फलक तयार केले.

त्यातील एक फलक फडकावून आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी ग्रामस्थांच्या भुमिकेस आपला पाठींबा असल्याचे जाहिर केले. आता बऱ्याच ठिकाणी असे फलक लावण्यात येणार असल्याने नेमका कुणाच्या फलकावर आक्षेप घ्यायचा, असा प्रश्न देसाई यांच्या समोर निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

साईसंस्थानने याबाबत आपली भुमिका स्पष्ट करावी. ग्रामस्थांनी व साईसंस्थानने एकत्र बसून निर्णय घ्यावा. आपण ग्रामस्थां सोबत आहोत. बाहेरील व्यक्तींनी त्यात हस्तक्षेप करून वातावरण गढूळ करू नये, अशा शब्दात आमदार विखे पाटील यांनी आपली भुमिका स्पष्ट केली. 

त्यापूर्वी त्यांनी नगरपंचायत कार्यालया समोर ग्रामस्थांनी तयार केलेला, एक विनंती फलक त्यांनी हातात धरून फडकविला. या फलकावर साई दर्शनासाठी येताना भाविकांनी भारतीय संस्कृतीला अनुसरून किंवा सभ्य पोषाख करून यावे. अशी विनंती करणारा मजकुर होता. यावेळी भाजपचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, माजी नगराध्यक्ष कैलास कोते, नगरसेवक अभय शेळके, नितीन कोते यांच्यासह विवीध संस्थांचे पदाधिकारी उपस्थीत होते.

जाहिर केल्याप्रमाणे मनसेच्या महिला आघाडीच्या प्रमुख सुरेखा दत्तात्रेय कोते यांनी अशा आशयाचे दहा फलक तयार करून ते शहरात ठिकठिकाणी लावले. उद्या आम्ही शहरा बाहेरील स्वागत कमानीवर हा मजकुर असलेला मोठा फलक लावणार आहोत. देसाई यांनी आमचे फलक येथे येऊन हटवून दाखवावेत. असे आव्हान त्यांनी दिले.

ग्रामस्थ व मनसे यांच्या वतीने शहरात ठिकठिकाणी असे फलक लावले जाणार आहेत. त्यामुळे साईसंस्थानचे विनंती फलक हटविण्यासाठी देसाई येथे आल्या तर त्यांना संस्थान बरोबरच ग्रामस्थांच्या फलकांच्या विरोधात देखील भुमिका घ्यावी लागेल.

संपादन : अशोक मुरुमकर 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP MLA Vikhe Patil supports the role of victims in Shirdi