शेवगावात भाजमधील अंतर्गत गटबाजीतील धुसफूस चव्हाट्यावर

सचिन सातपुते
Wednesday, 7 October 2020

शेवगाव नगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन कामाच्या नवीन ठेक्याचा शुभारंभावरुन सत्ताधारी भाजपच्या दोन गटातील अंतर्गत धुसफूस चव्हाटयावर आली.

शेवगाव (अहमदनगर) : शेवगाव नगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन कामाच्या नवीन ठेक्याचा शुभारंभावरुन सत्ताधारी भाजपच्या दोन गटातील अंतर्गत धुसफूस चव्हाटयावर आली. येत्या काही महिन्यावर येवून ठेपलेल्या नगरपालीकेच्या निवडणूकीवर पडसाद उमटण्याची चिन्हे आहेत. भाजपचे राज्य सरचिटणीस व जिल्हा प्रभारी लक्ष्मण सावजी यांच्या दौऱ्यावेळी गटबाजीचे हे दर्शन घडल्याने कार्यकर्ते मात्र सैरभैर झाले आहेत. 

शेवगाव नगरपालीकेत अडीच वर्षापासून भाजपची सत्ता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून मोठया लोकसंख्येचे शहर नगरपालीकेच्या माध्यमातून ताब्यात आल्यानंतर नागरीकांना व पक्ष कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्याकडून मोठया अपेक्षा होत्या. मात्र दोन अडीच वर्षाचा काळ उलटला तरी शहराच्या पदरात फारसे काही पडले नाही. भाजपच्या नगरसवेकातील अंतर्गत गटबाजीमुळे व जिरवाजीरवीच्या राजकारणामुळे मागचा कारभार बरा होता. अशी म्हणण्याची वेळ शेवगावकरांवर आली आहे. नगरपालीकेतील घनकचरा व्यवस्थापन कामाच्या चौकशीसाठी पक्षाचे दोन नगरसेवक थेट विधान परिषदेतील विरोधीपक्ष नेते प्रविण दरेकर व विभागीय आयुक्त यांच्याकडे दाद मागण्यासाठी गेले. नगरपालीकेत पक्षाचीच सत्ता असतांना त्यांनी नगरपालीकेच्या काराभाराचे वेगवेगळ्या माध्यमातून सतत वाभाडे काढले. 

सर्व साधारण सभेतही महत्वाच्या कामांवरुन, निधीच्या वाटपावरुन पक्षामध्ये धुसफुस सुरुच राहीली. राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी सोयीप्रमाणे भुमिका घेत त्यांच्यातील गटबाजी कशी कायम राहील याकडेच लक्ष दिले. त्यामुळे अवघे आठ नगरसेवक पक्षाकडे असतांना त्यांच्यामध्ये दोन तीन गट कार्यरत होते. 

नगरपरीषदेने एक कोटी 43 लाख रुपये खर्चाचा घनकचरा व्यवस्थापनाचा ठेका गंगापूर येथील एजन्सीला दिला. त्याचा शुभारंभ भाजपचे राज्य सरचिटणीस व जिल्हा प्रभारी लक्ष्मण सावजी यांच्या उपस्थितीत, जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे, नगराध्यक्षा राणी विनोद मोहीते, उपनगराध्यक्ष वजीर पठाण, भाजपच्या महिला तालुकाध्यक्षा आशा गरड, तुषार वैदय, भिमराज सागडे, नगरसेवक नितीन दहिवाळकर, अंकुश कुसळकर यांनी घडवून आणला.

या कार्यक्रमाला तालुक्याच्या लोकप्रतिनिधी आमदार मोनिका राजळे पत्रिकेत त्यांचे नाव असूनही अनुउपस्थित होत्या. तसेच पक्षाच्या शहर शाखेच्या वतीने शहराध्यक्ष रविंद्र सुरवसे, नगरसेवक अशोक आहुजा यांनी आयोजीत कार्यक्रमास भाजपचे तालुकाध्यक्ष ताराचंद लोढे, माजी तालुकाध्यक्ष बापुसाहेब पाटेकर, गणेश कोरडे, महेश फलके, सुरज लांडे, अमोल घोलप आदी उपस्थित होते.

यामुळे एकाच दिवशी शहरातील दोन वेगवेगळ्या ठिकाणी पक्षाने केलेला कार्यक्रम चर्चेचा विषय ठरला. त्यानिमीत्त भाजपधील अंतर्गत गटबाजी शेवगावकरांना पहायला मिळाला. त्यामुळे सत्ताधारी भाजपमध्ये नेमके कोणाला कोणाला मानणारे किती गट कार्यरत आहेत. याचा अंदाज पक्षांच्या कार्यकर्त्यांनाच येईनासा झाला आहे. अवघ्या काही महिन्यांवर येवून ठेपलेल्या नगरपरीषदेच्या निवडणुकीच्या तोंडावर शिस्तप्रीय पक्ष मानल्या जाणा-या भाजपमधील ही गटबाजी पक्षासाठी धोक्याची घंटा ठरणार आहे. याकडे श्रेष्ठींनी गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP political story in Shevgaon municipality