कोल्हार घोटी राज्यमार्गाच्या कामाला प्रारंभ न झाल्यास जनआंदोलनाचा भाजपाचा इशारा

आनंद गायकवाड
Friday, 9 October 2020

वाहतुकीची मोठी घनता असलेल्या कोल्हार घोटी राज्यमार्गावरील असंख्य खड्ड्यांमुळे या राज्यमार्गाची दुरवस्था झाली आहे. यामुळे यामार्गावरील प्रवाशांचे हाल होत असल्याने, दुरुस्तीची मागणी होत आहे.

संगमनेर (अहमदनगर) : वाहतुकीची मोठी घनता असलेल्या कोल्हार घोटी राज्यमार्गावरील असंख्य खड्ड्यांमुळे या राज्यमार्गाची दुरवस्था झाली आहे. यामुळे यामार्गावरील प्रवाशांचे हाल होत असल्याने, दुरुस्तीची मागणी होत आहे. 

संगमनेर भाजपाच्यावतीने याबाबत कार्यकारी अभियंत्यांशी चर्चा झाली असून, आगामी आठवड्याच कामाला सुरवात होणार असल्याची माहिती प्रसिध्दी पत्रकातून दिली आहे. या राज्यमार्गावरील शहरातील दिल्ली नाका ते कोकणगाव, निझर्णेश्वर मंदिर या दरम्यान मोठ्या प्रमाणावर पडलेल्या खड्ड्यांमुळे दुचाकी तसेच चारचाकी वाहनचालकांचे मोठे हाल होत असून, शारिरीक व्याधींना सामोरे जावे लागत आहे.

प्रसारमाध्यमांनी या बाबत वृत्त दिल्यानंतर मध्यंतरीच्या काळात डागडुजीचा मुलामा देण्यात आला होता. तोही सप्टेंबर अखेरीच्या पावसाने उखडला आहे. या संदर्भात भारतीय जनता पक्षाने सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता आर. आर. पाटील यांच्याशी मोबाईलद्वारे सम्पर्क केला. त्यांनी पुढील आठ दिवसात खड्डे बुजविण्याचे काम सुरु करण्याची तसेच दसऱ्या पासून डांबरीकरण करण्याची ग्वाही दिली आहे. 

त्याचप्रमाणे संगमनेर अकोले या रस्त्याची दुरुस्ती करणार असल्याची माहिती दिली आहे. या रस्त्यावरील शहापूर ते राजूर पर्यंत नवीन डांबरीकरण पूर्ण होत आले असून, आता संगमनेर ते अकोले डांबरीकरणाची सुरवात करण्यात येणार असल्याचे सांगितले.

हे खड्डे बुजविण्याची कामे त्वरित सुरु न केल्यास एक मोठे जनआंदोलन करणार असल्याचा इशारा भाजपा जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष श्रीराज डेरे, शिरीष मुळे, जिल्हा उपाध्यक्ष सुधाकर गुंजाळ, शिवाजीराजे लष्करे, मेघा भगत, शहराध्यक्ष अँड. श्रीराम गणपुले, तालुकाध्यक्ष डॉ. अशोक इथापे, ज्ञानेश्वर करपे, जावेद जहागीरदार, सीताराम मोहरीकर, किशोर गुप्ता, सुनील खरे, दीपेश ताटकर, अरुण पवार, डॉ. सुनील पवार, दीपक भगत आदी कार्यकर्त्यांनी दिला आहे.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP warning of people movement if work on Kolhar Ghoti state highway is not started