काश्‍मीरमधील कलम 370 व 500 वर्षांपासूनचा राममंदिराचा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोडविला

सचिन सातपुते
Saturday, 5 December 2020

देशाचे प्रलंबित प्रश्न 2014पासून सोडवायला सुरवात झाली.

शेवगाव (अहमदनगर) : देशाचे प्रलंबित प्रश्न 2014पासून सोडवायला सुरवात झाली. काश्‍मीरमधील कलम 370चा प्रश्न, 500 वर्षांपासून प्रलंबित असलेला राममंदिर प्रश्न आदी गुंतागुंतीचे प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोडविले.

कार्यकर्त्यांसाठी प्रशिक्षण शिबिर खूप महत्त्वाचे आहे. सर्वसामान्य कार्यकर्त्यांची पक्ष दखल घेत असून, भविष्यात त्यांना योग्य जबाबदारी दिली जाणार आहे, असे प्रतिपादन भाजपचे महाराष्ट्र प्रदेश संघटनमंत्री विजय पुराणिक यांनी केले. 

शेवगाव तालुका भाजपतर्फे आयोजित कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचे उद्‌घाटन आमदार मोनिका राजळे यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी भाजपचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे होते. जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब महाडीक, दिलीप भालसिंग, सुभाष गायकवाड, राहुल जामदार, भाजपचे जिल्हाध्यक्ष (उत्तर) राजेंद्र गोंदकर, किसान मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश सदस्य बापूसाहेब पाटेकर, उपनगराध्यक्ष वजीर पठाण उपस्थित होते. 

आमदार राजळे म्हणाल्या, पंतप्रधान, गृहमंत्री व भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार व भारतीय जनता पक्षाची वाटचाल यशस्वीपणे सुरू आहे. कार्यकर्त्यांनी पक्षाचे विचार व केंद्रातील मोदी सरकारच्या योजना सामान्य जनतेपर्यंत पोचविण्याचे काम करावे. नगरसेवक अशोक आहुजा, गणेश कोरडे, कमलेश गांधी, सागर फडके, नितीन दहिवाळकर, अंकुश कुसळकर, दिगंबर काथवटे उपस्थित होते. प्रास्ताविक व सूत्रसंचालन भीमराज सागडे यांनी केले. भाजपचे तालुकाध्यक्ष ताराचंद लोढे यांनी आभार मानले.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP workers training camp in Shevgaon