Video : माणुसकीला काळिमा : नगरमध्ये कोरोना मृतांचा खच, एकावर एक रचून नेले अमरधामात

अमित आवारी
Monday, 10 August 2020

माझ्या माळीवाडा भागातील मित्राच्या वडिलांचे कोविडने निधन झाले. त्यांना पाहण्यासाठी जिल्हा रुग्णालयात गेलो होतो. त्यावेळी हा धक्कादायक प्रकार समोर आला.

नगर ः जिल्ह्यात कोरोनाने हातपाय पसरले आहेत. या प्रादूर्भावामुळे संपूर्ण जिल्हा भेदरला आहे. रोज पाचशे रूग्ण बाधित आढळून येत आहेत. नगरचा मृत्यू दर कमी आहे, असे सांगितले जात असले तरी ते प्रमाण वाढले आहे. काल एका नगरसेवकाने स्टिंग अॉपरेशन केल्यानंतर धक्कादायक प्रकार समोर आला.

महापालिकेच्या एकाच शववाहिकेतून तब्बल 12 कोरोनाबाधित रुग्णांचे मृतदेह टाकण्यात आले. हा मृतदेहांचा खच नक्कीच काळजी वाढवणारा आहे. नगरसेवक बाळासाहेब बोरोटे यांच्या दक्षतेमुळे हा प्रकार समोर आला. 

नगरसेवक बोराटेंमुळे प्रकार उघड

या संदर्भातील निवेदन त्यांनी महापालिका आयुक्‍त श्रीकांत मायकलवार यांना आज दिले. बोरोटे यांनी उघड केलेल्या या प्रकाराची आज नगर शहरात जोरदार चर्चा होती. 

हेही वाचा - कलेक्टर-भाजप नेत्यांत धुसफूस

निवेदनात म्हटले आहे की, नगर शहरासह जिल्ह्यामध्ये कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर वाढत चालले आहे. प्रशासकीय पातळीवर ज्या पध्दतीने उपाययोजना व्हायला पाहिजे, त्या कोठेही होत नाहीत. 

मानवतेला काळिमा फासणारा प्रकार

रविवारी (ता. 9) माझ्या माळीवाडा भागातील मित्राच्या वडिलांचे कोविडने निधन झाले. त्यांना पाहण्यासाठी जिल्हा रुग्णालयात गेलो होतो. त्या ठिकाणी काल (रविवारी) दिवसभरातील कोविडने निधन झालेले 12 रुग्ण एका शववाहिकेमध्ये ठेवण्यात आले होते. यात मयत ४ महिला व ८ पुरुष यांचा समावेश होता. हे मृतदेह अंत्यविधीसाठी अमरधाम येथे नेण्यासाठी एकमेकांवर रचलेले होते. ही मानवतेला काळीमा फासणारी, मृतदेहांची अवहेलना पाहून मन हेलावून गेले.

योग्य उपचार होतात का नाही याचीही शंका

कोरोना रुग्णांच्या मृतदेहांची जिल्हा रुग्णालय व महापालिकेकडून अवहेलना सुरु आहे. घडलेला प्रकार हा अतिशय क्लेषदायक व धक्कादायक आहे. या सर्व बाबी लक्षात घेता प्रशासनाचा भोंगळ कारभार उघड झाला आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांवर योग्य उपचार होतात का नाही? असाही प्रश्न आता निर्माण झाला आहे.

जनआंदोलन करणार

दोन दिवसांमध्ये जर या सर्व व्यवस्थेमध्ये सुधारणा झाली नाही तर वरीष्ठ पातळीवर याची तक्रार करणार आहे. तसेच नगर शहर शिवसेनेतर्फे जन आक्रोश आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. 
 

त्या शववाहिकेत तीन ते चार कोरोना बाधितांचे मृतदेह दिसत आहेत. या संदर्भात संबंधित व्यक्तीला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्याच्या खुलाशानंतर कारवाई होईल.

- श्रीकांत मायकलवार, आयुक्त महापालिका, अहमदनगर.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bodies of 12 corona patients in a single ambulance in Ahmednagar