esakal | कलेक्टर-भाजप नेत्यांमध्ये धुसफूस...निवेदनही न घेतल्याने थेट फडणवीसांकडे तक्रार
sakal

बोलून बातमी शोधा

Dispute between Collector-BJP leaders

खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांची लॉकडाउनची मागणी जिल्हाधिकारी स्वीकारत नाहीत. नगरमधील व्यापाऱ्यांची दुकाने सायंकाळी पाच वाजता बंद केली जातात.

कलेक्टर-भाजप नेत्यांमध्ये धुसफूस...निवेदनही न घेतल्याने थेट फडणवीसांकडे तक्रार

sakal_logo
By
अमित आवारी

नगर ः जिल्हाधिकारी आणि भाजप नेत्यांमध्ये कोणत्या ना कोणत्या कारणावरून धुसफूस आहे. खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी जाहीरपणे जिल्हाधिकाऱ्यांवर टीका केली होती. त्याची पुनरावृत्ती आज आजही झालीच, कारण होते कोरोनाचेच. भाजपचे नेते कोरोनासंदर्भात निवेदन घेऊन आले होते. जिल्हाधिकाऱ्यांनी सोशल डिस्टन्सिंगचा मुद्दा उपस्थित करीत हे निवेदन घेण्यास नकार दिला. त्यामुळे भाजपचे नेते दुखावले आहेत.

ज्या ठिकाणी भाजपचे निवेदन स्वीकारले नाही तेथेच खासदार सदाशिव लोखंडे यांचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांनी घेतले. भाजपचे शहर-जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे यांनी याबाबत नाराजी व्यक्‍त केली. तसेच त्यांनी जिल्हाधिकारी भाजपला सापत्न वागणुकीचा निषेधही केला.

हेही वाचा - मोटारसायकल चोरी गेली मग सेटलमेंट करा सापडेल

जिल्हाधिकारी कार्यालयात आज खासदार लोखंडे यांची शिर्डी लोकसभा मतदारसंघातील विविध नागरी समस्यांसंदर्भात जिल्हाधिकारी द्विवेदी यांच्याशी बैठक झाली. बैठक संपल्यावर जिल्हाधिकारी द्विवेदी जिल्हा रुग्णालयाकडे जाण्यास निघाले. तेवढ्यात भाजपचे शहर-जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे व भाजप व्यापारी संघटनेचे विलास गांधी, अनिल गट्टाणी, विवेक नाईक आदी शहरातील व्यापाऱ्यांच्या समस्यांचे निवेदन घेऊन गेले.

जिल्हाधिकारी द्विवेदी यांना भाजप शिष्टमंडळ मागण्या सांगून निवेदन देऊ लागले. द्विवेदी यांनी कोरोनामुळे मी निवेदन स्वीकारत नसल्याचे स्पष्ट केले. तेवढ्यात खासदार लोखंडे तेथे आले. त्यांनी बैठकीसंदर्भातील पत्र देण्याचे राहून गेल्याचे सांगत ते पत्र जिल्हाधिकाऱ्यांना दिले. जिल्हाधिकाऱ्यांनी ते पत्र स्वीकारून त्यांच्या वाहनातून निघून गेले.

या प्रकारामुळे भाजपचे नेते दुखावले. त्यांनी उपस्थित पत्रकारांकडे जिल्हाधिकाऱ्यांबाबत नाराजी व्यक्‍त केली. 
गंधे म्हणाले, ""खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांची लॉकडाउनची मागणी जिल्हाधिकारी स्वीकारत नाहीत. नगरमधील व्यापाऱ्यांची दुकाने सायंकाळी पाच वाजता बंद केली जातात. दुकाने वेळेवर बंद न झाल्यास दंड आकारला जातो. दुकाने बंद करण्यासाठी वेळ लागतो. दुकानात ग्राहक, कामगार बाहेर घेणे, शटर खाली करणे यासाठी वेळ लागतो. त्यामुळे व्यापाऱ्यांची दुकाने वेळेवर बंद होत नाहीत. जिल्हा प्रशासनाने व्यापाऱ्यांना वेळ वाढवून द्यावा. 

या मागणीचे निवेदन आम्ही घेऊन गेलो होतो. ते निवेदन घेण्यास कोरोनाचे कारण दाखविण्यात येते; पण खासदार लोखंडे यांचे पत्र आमच्या समोरच स्वीकारले जाते. ही सापत्न वागणूक आहे. याबाबत मी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रवीण दरेकर यांना कळविले आहे. तसेच भाजपतर्फे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांचा निषेध केला आहे.'' 

संपादन - अशोक निंबाळकर