नेवाशातील या मुस्लिम नवदाम्पत्याने लग्नातच, जे पाऊल टाकले ते तुम्हालाही जमेल काय?

सुनील गर्जे
Sunday, 17 January 2021

समाजातील अंधश्रद्धेला छेद देण्याचेही काम त्यांनी केले. यशवंत सामाजिक प्रतिष्ठान'च्या नेत्रदान चळवळीतून त्यांनी प्रेरणा घेतली.

नेवासे : नेत्रदान हे सर्वश्रेष्ठ दान मानण्यात आले आहे. आपल्या या योगदानामुळे कोणाच्यातरी अंधारमय जीवनात निश्चित प्रकाशाची पहाट उजडेल या उदात्त हेतूने कुकाणे (ता.नेवासे) येथे पठाण-इनामदार या परिवारातील वधू सिमरन व वर नदीम या दोघांची लग्नगाठ बांधण्यात आली. त्यांनी त्याप्रसंगी 'मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प करून वेगळा आदर्श निर्माण केला आहे. 

समाजातील अंधश्रद्धेला छेद देण्याचेही काम त्यांनी केले. यशवंत सामाजिक प्रतिष्ठान'च्या नेत्रदान चळवळीतून त्यांनी प्रेरणा घेतली.
कुकाणे येथील सामाजिक कार्येकर्ते समीर पठाण यांची कन्या सिमरन व खेडले परमानंद येथील मुनीर इनामदार यांचा मुलगा नदीम यांचा विवाह नुकताच कुकाणे येथे माजी आमदार पांडुरंग अभंग, युवा नेते उदयन गडाख, मुस्लीम समाजाचे ज्येष्ठ नेते कदर इनामदार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. त्याप्रसंगी यावधू-वरांनी नेत्रदान संकल्प अर्ज 'यशवंत'कडे सुपूर्द केला. 

हेही वाचा - विखे पाटलांनी घेतली अण्णांची भेट, म्हणे कोरोना लसीवर चर्चा

यशवंत सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत पाटील गडाख यांनी 2010 मध्ये 'संकल्प नेत्रदानाचा' हा सुरू केलेला उपक्रम योग्य नियोजन व जनजागृतीमुळे लोकचळवळ झाल्याने सामाजात नेत्रदानाविषयी असलेले समज-गैरसमज, अंधश्रद्धा दूर झाले. आणि त्यातूनच अनेक मरणोत्तर नेत्रदान घडून आणण्यात 'यशवंत'ला यश आले. याच उपक्रमातून सिमरन व नदीम या उच्चशिक्षितांनी मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प सोडला. 

'यशवंत'मुळे 600 दृष्टिहीनांनी पाहिली सृष्टी..!

ज्येष्ठ साहित्यिक यशवंतराव गडाख यांच्या वाढदिवसाचे औचित्य व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली 'यशवंत'चे अध्यक्ष प्रशांत पाटील गडाख यांनी 'संकल्प नेत्रदानाचा' या उपक्रम सुरू केला. आजपर्येंत 'यशवंत'कडे 30 हजार मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प अर्ज दाखल झाले आहेत. 300 नेत्रदान घडून आणल्याने सुमारे सहाशे दृष्टीहिनांना दृष्टी मिळाली. 
 

"आम्ही नेवासे तालुक्यातीलच असल्याने 'यशवंत'च्या माध्यमातून प्रशांत पाटील गडाख हे राबवित असलेले अनेक सामाजिक, शैक्षणिक आदी उपक्रमाची प्रेरणा घेत आम्ही दोघांनी मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प केला. आम्ही आमच्या वैवाहिक जीवनाची सुरुवात एका चांगल्या संकल्पनेने केल्याचा खूपच आनंद आहे.
- सिमरन व नदीम इनामदार, नववधू-वर
 

 संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The bride and groom in Nevasa decided to donate their eyes