राधाकृष्ण विखे पाटलांनीही घेतली अण्णांची भेट, म्हणे कोरोनावर चर्चा झाली

एकनाथ भालेकर
Sunday, 17 January 2021

खासदार डॉ. सुजय विखे पाटील आणि गिरीश महाजन यांनी अण्णांची भेट घेऊन त्यांना आंदोलनापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला होता. त्याबाबतच आमदार राधाकृष्ण विखे पाटलांची भेट असल्याची चर्चा आहे.

राळेगण सिद्धी : ""सरकारने आरोग्य क्षेत्रातील कोरोना योद्‌ध्यांना लसीकरणाची सुरवात केली. सरकारने हे खूप चांगले पाऊल उचलले. लसीकरणाने कोरोनाबाबतची जनतेच्या मनातील भीती दूर होईल,'' असा विश्वास ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केला. 

भाजपचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी शनिवारी (ता. 16) सायंकाळी उशिरा हजारे यांची राळेगणसिद्धीत भेट घेऊन, कोरोना लसीकरणाबाबत माहिती दिली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

अण्णांनी शेतकरी कायद्याविरोधात आंदोलनाचा इशारा दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर खासदार डॉ. सुजय विखे पाटील आणि गिरीश महाजन यांनी अण्णांची भेट घेऊन त्यांना आंदोलनापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला होता. त्याबाबतच आमदार राधाकृष्ण विखे पाटलांची भेट असल्याची चर्चा आहे.

हजारे म्हणाले, ""मागील नऊ-दहा महिन्यांपासून कोरोनाने धुमाकूळ घातला. कोरोना योद्धा म्हणून काम करणारे डॉक्‍टर, नर्स, अंगणवाडी सेविका, पोलिसांनाही याची लागण होऊन जीव गमवावे लागले. मास्कचा वापर, सोशल डिस्टन्स, स्वच्छतेच्या सवयी, ऑनलाइन कामे, ऑनलाइन शिक्षण या चांगल्या बाबी आपणाला कोरोनाने शिकविल्या.'' 

विखे पाटील म्हणाले, ""कोरोना लसीकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्ष घातले असून, देशातील दोन कंपन्यांनी लसीकरणासाठी केलेले काम अत्यंत महत्त्वाचे आहे. आत्मनिर्भर भारतासासाठी हे खूप मोठे पाऊल आहे.''

संपादन - अशोक निंबाळकर 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vaccination will reduce fears about corona