लॉकडाउनमध्ये तुम्ही काय केलं, या फासे पारधी समाजातील पोरांनी काय केलं बघा

संजय आ. काटे
Wednesday, 6 January 2021

आकाश व विशालचे आई-वडील मजुरी करतात. महामानव बाबा आमटे संस्थेत आकाश व विशाल हे 10 वर्षांपासून निवासी शिक्षण घेतात. त्यांचे अन्य तीन भावंडेही येथेच शिकतात. कोणताही आधार नाही.

श्रीगोंदे : देऊळगाव येथील महामानव बाबा आमटे संस्थेतील विद्यार्थी आकाश भोसले व विशाल भोसले यांनी लॉकडाऊन काळात घरी बसून राहण्याऐवजी, परिस्थितीशी दोन हात करीत सहा महिने शेतीत, तसेच दुचाकी गॅरेजमध्ये रोजंदारीवर काम केले.

आई-वडिलांवर (अनिल पंडित भोसले व खलीदा अनिल भोसले) वेळोवेळी स्थलांतराची वेळ येऊ नये, यासाठी म्हशीचे दोन पिल्ले (वगारी) विकत घेऊन आधार दिला. 

आकाश व विशालचे आई-वडील मजुरी करतात. महामानव बाबा आमटे संस्थेत आकाश व विशाल हे 10 वर्षांपासून निवासी शिक्षण घेतात. त्यांचे अन्य तीन भावंडेही येथेच शिकतात. कोणताही आधार नाही.

घरकुल नाही. सध्या ते रामदास घोंगडे यांच्या तोंडेवाडी परिसरात तात्पुरते पाल ठोकून राहतात. वडील एका डोळ्याने अधू. त्यामुळे ते घरीच असतात. आई खलिदा कधी शेतमजुरी, तर कधी बिगारी म्हणून गवंड्यांच्या हाताखाली काम करते. 

कोरोनामुळे देशभर लॉकडाऊन जाहीर झाले. महामानव बाबा आमटे संस्थेने सुरवातीच्या काळात सलग तीन महिने किराणा आणि धान्य पुरविल्याने या कुटुंबाची भूक भागली. नंतर लॉकडाऊन शिथिल झाले, तरी शाळा सुरू झाली नाही. कुटुंब मोठे असल्याने मुलांनी कष्टाचा मार्ग स्वीकारला. कष्टातून दोन म्हशी विकत घेतल्या.

आज त्यांचे आई-वडील या म्हशींची काळजी घेतात. त्यातील एक म्हैस गाभण असल्याने लवकरच त्यांच्या घरात उत्पन्नाचे साधन होईल. उपजीविकेचे थोडी का होईना परवड थांबेल. दोन्ही विद्यार्थी डिसेंबरमध्ये शाळा सुरू झाल्याने संस्थेत दाखल झाले. त्यांची नियमित शाळा सुरू आहे. 

देशसेवेचे, हॉटेल व्यवसायात उतरण्याचे स्वप्न 
पारधी समाज कष्टाचा मार्ग स्वीकारत आहे. आपल्या कुटुंबाची काळजी घेत आहे. पालकांनी व्यसन सोडावे, यासाठी आग्रह धरीत आहे. भरकटलेल्या समाजाला नवी दिशा देण्याचे, तसेच नवीन पिढी तयार करण्याचे काम आकाश व विशाल करीत आहेत. आकाशला सैन्यात भरती होऊन देशसेवा करायची आहे, तर विशालला हॉटेल मॅनेजमेंट कोर्स करून हॉटेल व्यवसायात उतरायचे असल्याचे त्यांनी सांगितले. 

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Buffaloes taken from work by two children from a nomadic community in a lockdown