esakal | उसाच्या गाडीचा 'हिरा' जागीच गेला अन्‌ मालकाने फोडला हंबरडा
sakal

बोलून बातमी शोधा

A bull died while driving a sugarcane cart in Shrigonde taluka

दुपारची दीड वाजण्याची वेळ होती... ऊर उन्हात महादेव सानप हा ऊस तोडणी मजूर त्याच्या हिरा व तुरा नावाच्या बैलांची जोडीच्या जीवावर उसाची बैलगाडी घेवून चालला होता.

उसाच्या गाडीचा 'हिरा' जागीच गेला अन्‌ मालकाने फोडला हंबरडा

sakal_logo
By
संजय आ. काटे

श्रीगोंदे (अहमदनगर) : दुपारची दीड वाजण्याची वेळ होती... ऊर उन्हात महादेव सानप हा ऊस तोडणी मजूर त्याच्या हिरा व तुरा नावाच्या बैलांची जोडीच्या जीवावर उसाची बैलगाडी घेवून चालला होता. अचानक हिरा नावाचा बैल जागीच कोसळला. महादेवच्या अंगातील त्राणच निघून गेला. त्याने उसाच्या गाडीवरुन उडी घेतली मात्र तो खाली येईपर्यंत हिराने जीव सोडला होता. होत्याचे नव्हते झाल्याने घामाच्या धारांसोबतच डोळ्यातील अश्रुंना मोकळी वाट करुन देत महादेवने अक्षरश: हंबरडा फोडला.

त्याच्या कुटूंबानेही जीवाचा अकांत केला. हे दृश्य पाहणाऱ्या तरुणांनी सोशल मिडीयात गोड साखरेची कडू कहाणी या शिर्षकाखाली व्हिडीओ व्हायरल केला आणि त्या मजूराला मदतीचा ओघ सुरु झाला.

नागवडे सहकारी साखर कारखान्यावर उसाची खेप घेवून येणाऱ्या एका ऊस तोड मजूराची जीवाची घालमेल आणि डोळ्यातील धारांनी ओली झालेली जमीन यामुळे उपस्थितांच्या डोळ्याच्या कडा आपोआप ओल्या होत होत्या. भर उन्हात उसाच्या गाडीचा एका बाजूचा बैल जमिनीवर कोसळला. काय झाले हे समजण्यापलीकडे होते. उसाच्या गाडीवर बसलेल्या महादेव सानप (राहणार बावी कापसी ता. आष्टी जि. बीड)याने तशीच उडी घेतली. मात्र तोपर्यंत त्याच्या लाडक्या हिराने जीव सोडला होता. ज्याच्या जीवावर त्यांच्या कुटूंबाचा संसार सुरु होता तो असा अचानक सोडून गेल्याने महादेवने हंबरडा फोडला होता.

ही घटना घडली त्याचवेळी तेथे उपस्थिती असणाऱ्या तरुणांनी धाव घेतली मात्र त्या मजूराच्या डोळ्यातील अश्रु पाहताना सगळेच हतबल झाले. सुशांत राऊत, मोहित धोका, सूरज दिवेकर, चांगदेव उंडे, सोनू मोरे, अमोल राऊत, दीपक दांगडे, सोनू वंजारेव अविनाश नाडे या तरुणांनी तेथेच या ऊस तोडणी मजूराला न्याय देण्याचा चंग बांधला. या तरुणांनी त्या घटनेचे छायाचित्रण केले आणि 'गोड साखरेची कडू कहाणी' असे शिर्षक टाकून एक व्हिडीओ अपलोड केला. या मजूराचा हिरा नावाचा बैल परत येणार नाही मात्र त्याला दुसरा हिरा घेवून देण्यासाठी मदत करु व त्यासाठी एक मोबाईल क्रमांक दिला. ऐन दिवाळीत काळजाचा ठोका चुकविणारा व्हिडीओ लोकांच्या नजरेत आला आणि आता राज्यातील विविध भागातून त्या महादेव सानपसाठी मदत सुरु झाली आहे.

सुशांत राऊत म्हणाला, ती परिस्थिती उपस्थितांच्या डोळ्यात पाणी आणणारी होती. घाम गाळून ऊस तोड करणाऱ्या मजूरांच्या नशिबी काय असते याची ती झलक होती. त्यामुळे मित्रांनी एकत्रीत येत सोशल मिडीयाचा आधार घेतला. गेलेल्या बैलाची किंमत जास्त होती. मात्र सध्या राज्यातील विविध भागातून सुमारे पंचवीस हजार रुपये जमा झाले आहेत. अजून मदतीची गरज आहे. या मदतीतून महादेव सानप यांना नवा बैल घेवून देणार आहोत. त्यासाठी दानशूर लोकांनी संपर्क साधावा. 

संपादन : अशोक मुरुमकर