पाहून नवा ‘हिरा’, वाहिल्या अश्रूंच्या धारा; तरुणांनी ऊसतोड कामगारास दिला नवा बैल 

संजय आ. काटे 
Sunday, 22 November 2020

नागवडे कारखान्यासाठी ऊसवाहतूक करणारे महादेव सानप (रा. बावी कापसी, ता. आष्टी, जि. बीड) यांच्या "हिरा' नावाच्या बैलाचा अचानक मृत्यू झाला.

श्रीगोंदे (अहमदनगर) : नागवडे कारखान्यासाठी ऊसवाहतूक करणारे महादेव सानप (रा. बावी कापसी, ता. आष्टी, जि. बीड) यांच्या "हिरा' नावाच्या बैलाचा अचानक मृत्यू झाला. त्या वेळी सानप यांनी फोडलेला हंबरडा जवळच्या तरुणांनी ऐकला. त्यांनाही गहिवरून आले. सोशल मीडियातून त्यांनी सानप यांचा व्हिडिओ व्हायरल केला.

"सकाळ'नेही हा विषय मांडला नि पाहता पाहता बैलाच्या खरेदीसाठी मदत जमा झाली. काष्टीच्या बाजारात आज तरुणांनी सानप यांना 50 हजार रुपये किमतीचा नवा "हिरा' घेऊन दिला. त्या वेळी सानप यांच्या डोळ्यांतील पाणी थांबत नव्हते. 

हेही वाचा : उसाच्या गाडीचा हिरा जागीच गेला अन्‌ मालकाने फोडला हंबरडा
ऊसवाहतूक करताना सानप यांचा "हिरा' जागेवरच कोसळला. बैलगाडीवर बसलेल्या महादेव सानप यांनी तशीच उडी घेतली. मात्र, तोपर्यंत लाडक्‍या "हिरा'ने या जगाचा निरोप घेतला होता. सुशांत राऊत, मोहित धोका, सूरज दिवेकर, चांगदेव उंडे, सोनू मोरे, अमोल राऊत, दीपक दांगडे, सोनू वंजारे, अविनाश नाडे यांनी हा प्रकार पाहिला. त्यांनी या घटनेचे चित्रण केले.

"गोड साखरेची कडू कहाणी' असे शीर्षक देत हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला. त्याने लोकांच्या काळजाचा ठाव घेतला. "ई-सकाळ', तसेच ‘सकाळ’ने हा विषय समोर आणताच, मजुराला राज्यभरातून मदत सुरू झाली. बैलाच्या किमतीएवढी रक्कम जमा झाल्यावर, तरुणांना, "आता बस्स झाले, मदत पाठवू नका' असा संदेश द्यावा लागला. 

काष्टीच्या आठवडे बाजारात व्यापारी भाऊसाहेब माने यांच्याकडून तरुणांनी सानप यांच्या पसंतीने देखणा बैल खरेदी केला. त्याला सानप यांच्या हाती सोपविल्यावर त्यांच्या डोळ्यांतून धारा सुरू झाल्या. अनेकांनी या तरुणांचे कौतुक केले. नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे, संचालक सुभाष शिंदे यांनीही त्यांचा सत्कार करून कौतुक केले. 

कोण कुठले, ना ओळख ना पाळख; मात्र या तरुणांनी माझ्या वेदना जाणल्या. नवा बैल घेऊन दिला. माणसांच्या रूपाने देवच भेटला. 
- महादेव सानप, ऊसतोड कामगार 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The bull was given by the youth to the workers of Nagwade factory