नेवासे-श्रीरामपूर मार्गावर बर्निंंग कारचा थरार

सुनील गर्जे
Friday, 8 January 2021

पाचेगाव फाटा परिसरात आज पहाटे कारने अचानक पेट घेतला. रस्त्याच्या बाजूला कार थांबवून कारमधील सर्वांना बाहेर काढले. 

नेवासे : नेवासे-श्रीरामपूर महामार्गावर पाचेगाव फाटा (ता. नेवासे) येथे आज पहाटे अचानक लागलेल्या आगीत आलिशान मोटार जळून खाक झाली. त्यात चालकास किरकोळ भाजले असून, चालक व कारमधील इतरांच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली.

या बाबत नेवासे पोलिसांत अकस्मात घटनेची नोंद केली आहे. 
पोलिसांच्या माहितीनुसार, औरंगाबाद येथील पवन प्रकाश सदाशिवे (वय 32) मोटारीतून (एमएच 14 बीएक्‍स 8731) परिवारासह शिर्डी येथून घरी जात होते.

पाचेगाव फाटा परिसरात आज पहाटे कारने अचानक पेट घेतला. हा प्रकार लक्षात येताच, सदाशिवे यांनी रस्त्याच्या बाजूला कार थांबवून कारमधील सर्वांना बाहेर काढले. नंतर काही वेळातच आगीत संपूर्ण कार जळून खाक झाली.

दरम्यान, या घटनेत सदाशिव यांना किरकोळ भाजले असून, त्यांना नेवासे फाटा येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Burning car on Newase-Shrirampur road