
पर्यायाने त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीचे वेळ आली आहे. त्यामुळे ते मानसिक तणावाखाली आहेत. सार्वजनिक कार्यक्रमांतील उपस्थितीची मर्यादा 500पर्यंत वाढवावी किंवा कार्यालय, लॉन्स, हॉलच्या क्षमतेच्या 50 टक्क्यांपर्यंत करण्यात यावी.
नगर ः कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या आठ महिन्यांपासून सरकारने सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी घातली आहे. ती उठवावी, या मागणीसाठी जिल्हा मंडप, लाइट, फ्लॉवर्स डेकोरेटर्स व्यावसायिक असोसिएशनतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर बॅंड व वरातीसह मूकमोर्चा काढण्यात आला. या वेळी काही आंदोलकांनी काळे कपडे व झेंडे हाती घेतले होते.
निवेदनात म्हटले आहे, की सरकारने कोरोनामुळे लॉन्स, मंगल कार्यालयांतील कार्यक्रमांमध्ये उपस्थितीवर बंधने घातली. त्यावर टेन्ट, मंडप, केटरिंग, मंगल कार्यालय, बॅंक्वेट हॉल, डीजे, साऊंड, लाइट डेकोरेटर, इव्हेंट, फोटोग्राफर, बग्गीवाले, विविध कलावंत, आचारी, पुरोहित, ऑर्केस्ट्रा, प्रिंटिंग प्रेस आदी अवलंबून आहेत.
पर्यायाने त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीचे वेळ आली आहे. त्यामुळे ते मानसिक तणावाखाली आहेत. सार्वजनिक कार्यक्रमांतील उपस्थितीची मर्यादा 500पर्यंत वाढवावी किंवा कार्यालय, लॉन्स, हॉलच्या क्षमतेच्या 50 टक्क्यांपर्यंत करण्यात यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
या वेळी जिल्हाध्यक्ष चंद्रकांत मेहेत्रे, उपाध्यक्ष पोपट राऊत, जाफर शेख, रघुनाथ चौरे, बबन म्हस्के, विकास पटवेकर, अमित शेटे, बाळासाहेब लगे, सौरभ तरटे आदी उपस्थित होते.
याप्रसंगी शहराचे आमदार संग्राम जगताप, महापौर बाबासाहेब वाकळे, शिवसेना शहराध्यक्ष दिलीप सातपुते, विक्रम राठोड, बाळासाहेब बोराटे, संभाजी कदम आदींनी तेथे जाऊन संघटनेस पाठिंबा दर्शविला.
संपादन - अशोक निंबाळकर