ग्रामपंचायतीसाठी उमदेवारांची कागदपत्रांची जुळवाजुळव

गौरव साळुंके
Sunday, 20 December 2020

नामनिर्देशन अर्ज 30 डिसेंबरपर्यंत दाखल करणे आवश्‍यक आहे. राखीव जागेसाठी अर्ज दाखल करण्यासाठी आवश्‍यक असलेल्या जात पडताळणी प्रस्तावासाठी उमेदवारांची धावपळ सुरू आहे. 
 

श्रीरामपूर ः तालुक्‍यातील 27 ग्रामपंचायतींसाठी सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. नामनिर्देशन अर्ज दाखल करण्यासाठी 23 डिसेंबरपासून प्रारंभ होत आहे. त्यासाठी आवश्‍यक कागदपत्रे तयार करण्यासाठी उमेदवारांची धावपळ सुरू आहे. 

शहरातील विविध सेतू सुविधा कार्यालयासमोर विविध दाखले काढण्यासाठी गर्दी वाढली आहे. 
सरपंचपदाची आरक्षण सोडत निवडणुकीनंतर काढली जाणार असल्याने उत्कंठा आणखी वाढली आहे. विशिष्ट प्रवर्गासाठी आरक्षण निघाल्यानंतर उमेदवारी घ्यायची की नाही. हे निश्‍चित करता येते. परंतु, विजयी झाल्यानंतर सरपंचपदाचे चित्र स्पष्ट होणार असल्याने चुरस आणखी वाढली आहे.

निकालानंतर सरपंच पदाची सोडत जाहीर होणार असल्याने सर्वांनाच निवडून येणे गरजेचे बनले आहे. अनेक उमेदवारांनी सर्वसाधारण जागेसाठी गावातील नागरिकांशी जवळीक साधली आहे. तर, राखीव जागेसाठी गावातून अनेक सक्षम पर्याय शोधण्याची प्रक्रिया सुरू आहे.

नामनिर्देशन अर्ज 30 डिसेंबरपर्यंत दाखल करणे आवश्‍यक आहे. राखीव जागेसाठी अर्ज दाखल करण्यासाठी आवश्‍यक असलेल्या जात पडताळणी प्रस्तावासाठी उमेदवारांची धावपळ सुरू आहे. 
अहमदनगर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Candidates rush for documents for Gram Panchayat