पेमगिरी किल्ल्यावर सापडलेले तोफेचे दगडी गोळे

आनंद गायकवाड
Wednesday, 16 September 2020

स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले यांनी पेमाईदेवीच्या साक्षीने शहागडावर निजामशाहीचा शेवटचा वारस मुर्तझा (वय सहा वर्ष) राज्याभिषेक करुन, त्याच्या नावाने राज्यकारभाराची सूत्रे स्वतःच्या ताब्यात घेतली.

संगमनेर (अहमदनगर) : स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले यांनी पेमाईदेवीच्या साक्षीने शहागडावर निजामशाहीचा शेवटचा वारस मुर्तझा (वय सहा वर्ष) राज्याभिषेक करुन, त्याच्या नावाने राज्यकारभाराची सूत्रे स्वतःच्या ताब्यात घेतली. स्वराज्याचे स्वप्न शहाजीराजांनी ज्या गडावर पाहिले व छत्रपती शिवाजीराजांनी ते रायगडावर मूर्तरूपात साकारले. त्या दिवसाची आठवण म्हणून, बुधवारी (16 सप्टेंबर) तालुक्यातील पेमगिरीच्या शहागडावर भगवा ध्वज उभारुन "संकल्पदिन" साजरा होत आहे. 

संगमनेर तालुक्यातील काहीशा दुर्लक्षित असलेल्या पेमगिरी येथील शहागड उर्फ पेमगडाच्या संवर्धनासाठी परिसरातील तरुणाई एकवटली आहे. पंचक्रोशीतील शिवप्रेमी मावळे, ग्रामस्थ व संगमनेर येथील दुर्गसंवर्धन सह्यकडा या संस्थेच्या वतीने गडावरील वास्तूंची डागजुजी व जतनास सुरवात झाली आहे. 

पेमगिरी किल्लाचे संवर्धन, सुशोभिकरण, ऐतिहासिक वारशाचे जतन, इतिहासाचा प्रचार प्रसार करण्याचा संकल्प या तरुणाईने केला आहे. त्या दृष्टीने किल्ल्यावर स्वच्छता करतांना छोट्या तोफेचे 11 दगडी गोळे आढळल्याने, युवकांचा उत्साह वाढला आहे. प्रत्येकी सुमारे 200 ग्रॅम वजनाचे छोट्या चेंडूच्या आकाराचे हे गोळे, किल्ल्यावरील शत्रुचा हल्ला थोपवण्यासाठी, पायदळासमवेत आक्रमणासाठी वापरण्यात येत असावेत. अशा प्रकारच्या गोळ्यांचा मारा करु शकरणाऱ्या छोट्या तोफेला सुत्तर नाळ तोफ म्हणतात. हत्ती, उंट व घोड्यावरुन तीचा वापर करता येत असे अशी माहिती शस्त्र संग्राहक चंद्रशेखर कानडे यांनी दिली.

पेमगिरी गडावर पुढील काळात शहाजीसृष्टी उभारण्याचा मानस आहे. संकल्प दिन, दसरा मेळावा साजरा करून परिसराचा इतिहास जागृतीसाठी ग्रामस्थांचा सहभाग घेऊन पर्यटन विकास करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी वृक्षारोपण व संवर्धन, व्याख्याने, गड किल्ल्यांची मोहिम, शस्त्रपूजन व प्रात्यक्षिकांचे कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत.

शिवकालीन पध्दतीने सर्व सण उत्सव गडावर साजरे करून ऐतिहासिक वातावरण निर्माण करणे तसेच विविध स्पर्धांमध्ये स्थानिकांचा सहभाग वाढविण्याचा प्रयत्न असल्याची माहिती दुर्गसंवर्धन सह्यकडाचे श्रीप्रसाद कानडे यांनी सकाळशी बोलतांना दिली. या कामी सरपंच सोमनाथ गोडसे, पेमगिरी ग्रामस्थ व शिवप्रेमी मावळे एकजुटीने कामाला लागले आहेत.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cannonballs found at Pemgiri fort in Sangamner taluka