नाशिक हायवेवर पुण्याच्या प्रवाशांची कार दरीत कोसळली; दोघे ठार, दोन जखमी

शांताराम जाधव
Saturday, 20 February 2021

बाह्यवळणाच्या पुलावरून कार खाली तीस फूट कोसळल्याने चार पैकी दोन जणांचा मृत्यू झाला. अन्य दोन गंभीर जखमी झालेले आहेत.

बोटा (ता.संगमनेर)ः  पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरून संगमनेर दिशेने जाणाऱ्या कारचा भीषण अपघात सायंकाळी पाच वाजता बोटा शिवारातील झाला. बाह्यवळणाच्या पुलावरून कार खोल दरीत कोसळल्याने चार पैकी दोन जणांचा मृत्यू झाला. अन्य दोन गंभीर जखमी झालेले आहेत.

या बाबत समजलेली माहिती अशी - कार (क्रमांक एम एच १२ एच झेड ७५८२) ही कार पुणे येथून आळेफाटा मार्गे संगमनेरच्या दिशेने जात होती. सायंकाळी पाचच्या सुमारास बोटा शिवारातील बाह्यवळणावरून जात असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार थेट पुलावरून तीस फूट खाली कोसळली. रस्त्यालगतच्या लोखंडी फलक तोडून ओढ्यात कोसळलेल्या कारचा अक्षरशः चक्काचूर झाला.

पुण्याचे प्रवासी

घटनेची माहिती समजताच स्थानिक  नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत कारमधून जखमींना बाहेर काढून उपचारासाठी रुग्णवाहिकेतून आळेफाटा  व संगमनेर येथील रूग्णालयात पाठवले आहे. दरम्यान आळेफाटा येथे उपचारासाठी  दोघांना पाठविलेल्या पैकी  अठ्ठावीस वर्षीय आशिष (रा. गोरखपूर, उत्तर प्रदेश, पूर्ण नाव समजले नाही) या तरूणाचा मृत्यू झाला. तर सानिका लागू ( नौपाडा,जि.ठाणे) जखमी अवस्थेत आहे.

या शिवाय संगमनेर येथे पाठविलेले पुण्याचे (दोघेही रा. बिबवेवाडी, जि.पुणे) आहेत. माही देवस्थळे या महिलेचा मृत्यू झाला आहे. अनंत देवस्थळे जखमी अवस्थेत आहेत. यात घटनेची माहिती समजताच डोळासणे महामार्ग व घारगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Car crashes on Pune-Nashik highway