बघा आता हे कसंय, शेळीचोराला मारहाण केली म्हणून 11 जणांविरुद्ध गुन्हा

विलास कुलकर्णी 
Friday, 8 January 2021

पालिका हद्दीतील पिंपळाचा मळा येथील म्हेत्रे वस्तीवरील गोठ्यातून बुधवारी मध्यरात्री एकाने शेळी चोरली. ही बाब लक्षात येताच, ग्रामस्थांनी चोरास रंगेहाथ पकडले.

राहुरी (अहमदनगर) : शेतकऱ्याच्या गोठ्यातील शेळी चोरणाऱ्यास बुधवारी मध्यरात्री स्थानिकांनी रंगेहाथ पकडले. चोराला बेदम चोप देऊन, पोलिसांच्या हवाली केले. याप्रकरणी चोराविरुद्ध सात हजार रुपयांची शेळी चोरल्याचा गुन्हा दाखल झाला. मात्र, नंतर चोरास मारहाण करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियातून व्हायरल झाला. त्यामुळे पोलिसांनी मारहाण करणाऱ्या 11 ग्रामस्थांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

अहमदनगरच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा  

नंदू परसराम ससाणे (वय 35, रा. मुलनमाथा, राहुरी) असे आरोपीचे नाव आहे. त्यास मारहाण केल्याप्रकरणी रामदास उद्धवराव म्हेत्रे, आसाराम गणपत बनसोडे, हर्षद सुनील तनपुरे, प्रशांत सुनील तनपुरे, बाबासाहेब भाऊसाहेब मोरे, गणेश बाबूराव रणसिंग, राहुल रामदास म्हेत्रे (सर्व रा.राहुरी) व इतर चौघांचा आरोपींमध्ये समावेश आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पालिका हद्दीतील पिंपळाचा मळा येथील म्हेत्रे वस्तीवरील गोठ्यातून बुधवारी मध्यरात्री एकाने शेळी चोरली. ही बाब लक्षात येताच, ग्रामस्थांनी चोरास रंगेहाथ पकडले. रागाच्या भरात त्यास लाथा-बुक्‍क्‍यांनी मारहाण केली. एकाने हा प्रकार मोबाईलवर चित्रीत करून सोशल मीडियावर व्हायरल केला. तो पोलिसांपर्यंत पोहचला. कॉन्स्टेबल रवींद्र डावखर यांच्या फिर्यादीवरून, 11 ग्रामस्थांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A case has been registered against 11 persons for beating a goat thief at Rahuri