esakal | शेवगावातील त्या हरभरा ट्रकबाबत गुन्हा दाखल होणार
sakal

बोलून बातमी शोधा

shevgaon harbhara truk

पोलीस ठाण्यात अर्ज करून अनधिकृत हरभरा आणणारा व्यापारी , ट्रक चालक व ग्रेडर यांची चौकशी करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी केल्याचे समजते. मात्र रात्री उशीरापर्यंत कुठल्याच प्रकारचा गुन्हा दाखल झालेला नव्हता.

शेवगावातील त्या हरभरा ट्रकबाबत गुन्हा दाखल होणार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

शेवगाव:  येथील नाफेड खरेदी केंद्रावर अनधिकृत हरभरा आणलेले ट्रक संशयास्पद असुन संबंधितावर गुन्हे दाखल होणे गरजेचे आहे, असा अहवाल मार्केटींग फेरडेशनच्या विभागीय अधिका-यांनी दिला. त्यानुसार आदेश मार्केटींग फेडरेशनच्या वरिष्ठ अधिका-यांनी जिल्हा कार्यालयास कारवाईचे आदेश दिले आहे. त्यामुळे अनधिकृत हरभरा ट्रकप्रकरणी गुन्हे दाखल होणार आहेत, असे जिल्हा मार्केटींग अधिकारी श्रीकांत आभाळे यांनी सांगितले.

हेही वाचा - साहेब, लवकर या तो प्रेमिकेची सौदा करतोय

येथील नाफेडच्या केंद्रावर कळंब (जि. उस्मानाबाद ) येथून २६ टन हरभरा घेऊन आलेल्या दोन ट्रक मार्केटींग फेडरेशनच्या विभागीय अधिका-यांनी केलेल्या चौकशीत संशयास्पद व अनधिकृत आढळून आल्या.त्यांनी अहवाल देत जिल्हा मार्केटींग फेडरेशनच्या अधिका-यास कारवाईचे आदेश दिले.त्यानुसार जिल्हा कार्यालयाकडून केंद्रचालक ,ग्रेडर, गाडीमालक व ट्रेडरवर गुन्हा दाखल करणे अपेक्षित आहे. मात्र फेडरेशनचे अधिकारी यातील दोषी असलेल्या केंद्रचालक जगदंबा महिला ग्राहक सहकारी संस्थेलाच गुन्हा दाखल करण्याचे सांगत आहेत. त्यांनी ही जबाबदारी झटकल्याने कारवाईत तु तू मी मी प्रकार सुरू असल्याने हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे समजते.
आज पोलीस ठाण्यात आलेल्या  जिल्हा मार्केटींग अधिकारी श्रीकांत आभाळे यांना स्वाभिमानी शेतकरी संघटना, काँग्रेस व मनसेच्या पदाधिका-यांनी चांगलेच धारेवर धरले. या प्रकरणात सर्व दोषींवर कारवाई होईपर्यंत पाठपुरावा करण्याचे सर्व पदाधिका-यांनी ठरवल्यामुळे नेमके कोण कोणावर आणि काय कारवाई करते याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

जगदंबा महिला ग्राहक सहकारी संस्थेच्या अध्यक्षांनी आज पोलीस ठाण्यात अर्ज करून अनधिकृत हरभरा आणणारा व्यापारी , ट्रक चालक व ग्रेडर यांची चौकशी करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी केल्याचे समजते. मात्र रात्री उशीरापर्यंत कुठल्याच प्रकारचा गुन्हा दाखल झालेला नव्हता.
 

या प्रकरणातील केंद्र चालक संस्थेचीच भूमिका संशयास्पद आहे.त्यांच्या परवानगीशिवाय या ट्रक येथे येऊच शकत नाही. असे असतांनाही केंद्रचालकांना वाचवण्याचा जिल्हा मार्केटींग फेडरेेशनचा प्रयत्न सुरु असल्याचे दिसून येते. मात्र संघटना या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावल्याशिवाय थांबणार नाही.
- प्रशांत भराट, तालुकाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना.