मॅनेजरचा प्रताप, कॅशिअर तरूणीवर अत्याचार करून पतसंस्थेतील १६ लाख लांबवले

राजेंद्र सावंत
Tuesday, 22 December 2020

पाथर्डी-नगर रस्त्यावरील शहरातील खासगी मल्टिस्टेट संस्थेत व्यवस्थापक पदावर आरोपी सागर देशपांडे पूर्वी कार्यरत होता. काही कारणांनिमित्त संस्थेने त्याला कामावरून कमी केले होते.

पाथर्डी : शहरातील एका मल्टिस्टेट संस्थेतील माजी व्यवस्थापकाने चाकूचा धाक दाखवून रोखपाल तरुणीवर अत्याचार केला. तिचे नग्नावस्थेतील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत, संस्थेच्या तिजोरीतील 5 लाख 3 हजार 400 रुपये, तसेच ग्राहकांनी तारण ठेवलेले 11 लाख 65 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने बळजबरीने काढून घेतले.

या बाबत पीडित तरुणीच्या फिर्यादीवरून पाथर्डी पोलिसांनी माजी व्यवस्थापकाविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हे दाखल केले आहेत. सागर संजय देशपांडे (रा. वामनभाऊ नगर, पाथर्डी, मूळ रा. पैठण, जि. औरंगाबाद) असे त्याचे नाव आहे. 

हेही वाचा - शिवसेनेची संगमनेरात ग्रामपंचायतीसाठी डरकाळी

पाथर्डी-नगर रस्त्यावरील शहरातील खासगी मल्टिस्टेट संस्थेत व्यवस्थापक पदावर आरोपी सागर देशपांडे पूर्वी कार्यरत होता. काही कारणांनिमित्त संस्थेने त्याला कामावरून कमी केले होते. संस्थेतील ओळखीचा फायदा घेत, देशपांडे याने रोखपाल तरुणीस 16 ऑगस्ट रोजी त्याच्या घरी बोलाविले. तेथे चाकूचा धाक दाखवून तिचे नग्नावस्थेतील फोटो काढले. तिचे चित्रीकरण करून अत्याचार केला. हे फोटो व चित्रीकरण व्हायरल करण्याची धमकी देत, त्याने तरुणीकडून संस्थेच्या तिजोरीतील 5 लाख 3 हजार 400 रुपये काढले.

ग्राहकांनी संस्थेत तारण ठेवलेले 11 लाख 65 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिनेही काढून घेतले. शहरातील हॉटेलमध्ये 13 डिसेंबर रोजी तरुणीला बोलावून घेतले. संस्थेचे पैसे व दागिने परत मागितल्यास तिचे फोटो व चित्रीकरण व्हायरल करण्याची धमकी दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे. आरोपी देशपांडे गेल्या पाच दिवसांपासून पसार झाला असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The cashier blackmailed the girl and the manager took Rs 16 lakh