नगरमध्ये कोरोनाचे शतक !

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 27 मे 2020

जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोरोना टेस्ट लॅबमध्ये 54 व्यक्तींचे घशातील स्त्राव नमुने तपासण्यात आले. त्यात पाच व्यक्ती बाधित आढळून आल्या आहेत.

नगर ः जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच आहे. नुकत्याच आलेल्या अहवालानुसार पाच जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. त्यात नगर, राहुरी, पारनेर, राहाता, अकोले येथील व्यक्तींचा समावेश आहे. जिल्ह्यात कोरोनाचा आकडा आता 100 वर पोचला आहे. गेल्या चार ते पाच दिवसांपासून कोरोना बाधितांच्या संख्येत रोजच भर पडत आहे. त्यामुळे जिल्हावासियांच्या चिंतेत भर पडत आहे. 

हेही वाचा ः मामीने व्यापाऱयाला गंडविले तब्बल दाेन काेटींना

जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोरोना टेस्ट लॅबमध्ये 54 व्यक्तींचे घशातील स्त्राव नमुने तपासण्यात आले. त्यात पाच व्यक्ती बाधित आढळून आल्या आहेत. यात घाटकोपर येथून टाकळीमियॉं (राहुरी) येथे आलेली 35 वर्षीय महिला, भिवंडी येथून (नगर) शहरातील दातरंगे मळा येथे आलेला 60 वर्षीय व्यक्ती, ठाणे येथून (पारनेर) येथील हिवरे कोरडे येथे आलेला 46 वर्षीय व्यक्ती, घाटकोपर येथून पिंपळगाव (अकोले) येथे आलेली 66 वर्षीय महिला आणि (राहाता) येथील शिर्डी जवळील निमगाव येथील 55 वर्षीय महिला यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली. 

अवश्य वाचा ः काेणाचं खरं मानायचं...पुण्याच्या प्रयाेगशाळेत निगेटिव्ह, तर धूळ्यातून अहवाल पाॅझिटिव्ह

परजिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांनी स्वतःला विलगीकरण करून सार्वजनिक संपर्क टाळणे गरजेचे आहे. ज्या ज्येष्ठ नागरिकांना मधुमेह, सर्दी, खोकला आदी आजाराची लक्षणे आढळल्यास तत्काळ जवळच्या आरोग्य केंद्रात तपासणी करून घ्यावी. 
- राहुल द्विवेदी, जिल्हाधिकारी 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Century of Corona in town