उंबरे ग्रामपंचायतीत विखे पाटलांच्या व्याह्याचीच प्रतिष्ठा लागली पणाला

विलास कुलकर्णी
Sunday, 10 January 2021

विरोधी गटाच्या प्रचारात सत्ताधाऱ्यांनी आलटून-पालटून सत्ता घेतली. उमेदवारी मागे घेण्यासाठी दमबाजी केली. शुद्ध पिण्याचे पाणी दिले.

राहुरी : उंबरे ग्रामपंचायतीत मागील सत्ताधारी व विरोधी गट एकत्र आले. बिनविरोध निवडणुकीचे प्रयत्न केले; परंतु तरुणांच्या गटाने बिनविरोधचे प्रयत्न फोल ठरविले.

आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांचे व्याही तनपुरे साखर कारखान्याचे अध्यक्ष नामदेवराव ढोकणे यांच्या पत्नी रतनबाई यांना निवडणूक रिंगणात उतरावे लागले. त्यामुळे विखे पाटील यांच्या व्याह्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. 

सत्ताधारी आदिनाथ सेवा मंडळाचे नेतृत्व विखे गटाचे नामदेवराव ढोकणे व राज्यमंत्री तनपुरे गटाचे सुनील आडसुरे करीत आहेत. विरोधी सर्वपक्षीय गणराज शेतकरी मंडळाचे साहेबराव दुशिंग व कारभारी ढोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. रामकृष्ण ढोकणे, गोरक्षनाथ दुशिंग नेतृत्व करीत आहेत.

सोशल मीडिया, व्हिडिओ व ऑडिओ कॅसेटद्वारे हायटेक प्रचाराने निवडणुकीत रंग भरला आहे. घरोघरी फिरून मतदारांना साकडे घातले जात आहे. 

हेही वाचा - मोबाईल मॅपने केला घात, तीन पुणेकर कोसळले धरणात

मागील निवडणुकीत सुनील आडसुरे गटाचे आठ, तर नामदेवराव ढोकणे गटाचे सात सदस्य विजयी झाले होते. तेव्हा निवडणुकीनंतर एक वर्षात ढोकणे यांनी आडसुरे गटाचे तीन सदस्य फोडले. त्यामुळे ढोकणे गट दहा व आडसुरे गट पाच असे बलाबल झाले. यंदा दोन्ही गट एकत्र आले. त्यांचे निवडणूक बिनविरोधचे प्रयत्न तरुणांनी फोल ठरविले. 

सत्ताधारी गटाच्या प्रचारात मागील पाच वर्षांत अंतर्गत रस्ते, गटारी, शाळेची सुधारणा, अंगणवाड्यांना साहित्य वाटप, तरुणांना आधुनिक व्यायामशाळा अशी कोट्यावधी रुपयांची कामे केली. यापुढे विखे-तनपुरे यांच्या मदतीने भरीव विकास कामे केली जातील, असे प्रमुख मुद्दे आहेत.

विरोधी गटाच्या प्रचारात सत्ताधाऱ्यांनी आलटून-पालटून सत्ता घेतली. उमेदवारी मागे घेण्यासाठी दमबाजी केली. शुद्ध पिण्याचे पाणी दिले. त्यांना मतदान करा, असे मुद्दे आहेत. विखे पाटील यांच्या विहीणबाई रतनबाई ढोकणे यांच्याविरुद्ध सोनाली शेजूळ यांनी आव्हान उभे केले आहे. या लढतीकडे तालुक्‍याचे लक्ष वेधले आहे. अहमदनगर

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Challenge in front of Vikhe Patil's relatives in Umbre Gram Panchayat