मोबाईलवरील मॅपने केला घात, कळसूबाईकडे निघाले तीन पुणेकर अकोल्यात गेले वाहून

शांताराम काळे
Sunday, 10 January 2021

गावात निरोप जाताच चंद्रकांत घाटकर व काही तरुणांनी घटनास्थळी धाव घेऊन सकाळी पोहणारे नदीत उतरून गाडीसह घुले यांचा मृतदेह बाहेर काढला.

अकोले : मोबाईलवरील मॅप किंवा जीपीएस कसा घात करते याचे उदाहरणच पाहायचे झाल्यास ही घटना वाचा. एक-दोघे नव्हे तर तीन पुणेकरांवर चुकीच्या माहितीमुळे काळ ओढावला.

त्याचे असे झाले.ः सतीश सुरेश घले (वय ३४), गुरुसत्य राजेश्र्वर राक्षेकर (वय ४२), समीर अतुलकर (वय ४४ सर्व रा. पिंपरी चिंचवड, पुणे) हे एम .एच.१४ के. वाय. ४०७९ या गाडीने कळसूबाई शिखरावर जाण्यासाठी रात्री निघाले होते. 

मोबाईलवर दिसणाऱ्या मॅपप्रमाणे ते प्रवास करू लागले. त्यांना कळसूबाई शिखरावर जायचे होते. मात्र, मॅपने त्यांना कोतूळवरून राजूर मार्ग दाखवायला हवा होता. तो जवळचा आणि सुरक्षित होता. परंतु ते कोतूळहून अकोलेकडे निघाले.

या मार्गादरम्यान मुळा नदीवरील जुना पूल लागला. पिंपळगाव खांड धरण भरल्यामुळे हा पूल पाण्याखाली गेला आहे. चालकाला वाटले पुलावर थोडेच पाणी असेल. परंतु पुढे गेल्यावर त्यांचे वाहन पुलावरून धरणाच्या पाण्यात पडले. ती वेळ रात्री पावणेदोनची होती. त्यामुळे काहीच कळत नव्हते. तिघेही वाहू लागले. त्यातील दोघांना पोहायला येत असल्याने ते बाहेर पडले. त्यांनी पाण्याच्या बाहेर येत आरडाओरड सुरू केली.

हेही वाचा - विधवा भावजयीसोबत दिराने बांधली लग्नगाठ

त्यांचा आरडाओरड ऐकून शेजारील वस्तीवरील लोक तेथे धावले. ते सतीश यांचा शोध घेऊ लागले. सकाळी आठ वाजेपर्यंत ही शोधमोहीम सुरू होती.

सकाळी गावात निरोप जाताच चंद्रकांत घाटकर व काही तरुणांनी घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत घुले यांचा मृत्यू झाला होता. गाडीसह घुले यांचा मृतदेह बाहेर काढला. मोबाईलने चुकीचा मार्ग दाखवल्याने मृत्यूच्या मार्गाने जावे लागले.

जलसंपदा विभागानेही लावला नाही फलक

पिपरी चिंचवडमध्ये दुःखाचे वातावरण असून नातेवाईक कोतूळ येथे पोहचले आहेत. मृतदेह शवविच्छेदनासाठी कोतूळ ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले आहेत. जलसंपदा विभागाने या बंद असलेल्या पुलावर कोणतेही अडथळे अगर बोर्ड न लावल्यामुळे हा अपघात झाल्याचे ग्रामस्थांचे मत आहे.

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: On their way to Kalsubai three Punekars were swept away in Akola