Ahmednagar : नगरचा चंदेरी इतिहास होणार शब्दबद्ध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Drama

Ahmednagar : नगरचा चंदेरी इतिहास होणार शब्दबद्ध

अहमदनगर : नाट्यक्षेत्रासह बॉलीवूडमध्येही नगरी कलाकारांनी उत्तुंग कामगिरी केली आहे. त्यांचा हा चंदेरी पडद्यावरील सोनेरी इतिहास शब्दबद्ध केला जातोय. नाट्यकलावंत डॉ. श्याम शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हे शिवधनुष्य उचलले आहे. कलावंतांच्या संघर्षासह नाट्य चळवळीतील स्थित्यंतरांचाही अभ्यास केला जाणार आहे. अगदी आताच्या ओटीटी प्लॅटफॉर्मपर्यंतचा आढावा घेतला जाणार आहे.

साधारण शंभर वर्षांचा हा इतिहास आहे. सुमारे ९० वर्षांपूर्वी शाहू मोडक यांच्या रूपाने हा प्रवास सुरू झाला. बालकलाकार म्हणून त्यांनी कारकीर्द सुरू केली. परशुराम सोन्नीस (नायक-नट), राम नगरकर, मधुकर तोरडमल, सदाशिव अमरापूरकर, मधु कांबीकर यांनी नगरचे नाव सर्वदूर नेले. यशराज जाधव, शमीम शेख, मिलिंद शिंदे, किरण खोजे आदींनी एनएसडीत प्रवेश मिळवत नवा आयाम दिला.

प्रारंभी नगरला केंद्र नसल्याने नाट्यचळवळ फोफावली नाही. १९९० साली राज्य नाट्य स्पर्धेचे केंद्र सुरू झाले आणि कलाकारांना प्रोत्साहन मिळाले. दिग्दर्शक, अभिनेते, तंत्रज्ञ आदींच्या प्रतिभेला धुमारे फुटले. नगर शहरात सतीश लोटके, अनंत जोशी, शशिकांत नजान, अविनाश बेडेकर, रितेश साळुंके, राहुरीत विलास कुलकर्णी, राजू क्षीरसागर, श्रीरामपुरात कर्णेज अकादमी, अजय घोगरे, शेवगावात फिरोज काझी, गोकूळ क्षीरसागर, शैलेष मोडक आदी प्रमुख मंडळींनी संस्थेच्या माध्यमातून चळवळीस गती दिली. ग्रामीण भागांतून नाटकं रंगमंचावर यायला लागली. एनएसडीसारखी संस्थाही नगरी कलाकारांची दखल घ्यायला लागली.

अनेक कलाकारांची पावले मुंबईकडे वळू लागली. संघर्षाला तोंड देत त्यांनी कलागुणांचा डंका वाजवला. तंत्रज्ञ वेगवेगळ्या क्षेत्रांत पुढे येऊ लागले. हा वैयक्तिक पातळीवरील संघर्ष असला तरी तो नगरचा रूपेरी पडद्यावरील इतिहास आहे. तो केवळ नाट्यक्षेत्रातील नव्हे तर इतर अभ्यासकांसाठी मोलाचा ठरणार आहे. सप्तरंग थिएटर्सचे डॉ. श्याम शिंदे हे नगरचा हा समृद्ध इतिहास शब्दबद्ध करीत आहेत. विविध तज्ज्ञ मंडळींकडून त्यांनी लेख लिहून घेतले आहेत. आतापर्यंतच्या १०० वर्षांत तब्बल दीड हजार कलाकारांनी योगदान दिले आहे.

नगरचे नाव उंचावले

सध्या मिलिंद शिंदे, मोहनिराज गटणे, क्षितिज झावरे, प्रकाश धोत्रे, किरण खोजे, पूर्णानंद वांढेकर, संदीप दंडवते, अमित बैचे, हरिष दुधाडे, कृष्णा वाळके, कामोद खराडे आदी चित्रपटसृष्टी गाजवत आहेत. नरेंद्र फिरोदिया, बलभीम पठारे, डॉ. रणजीत सत्रेंसारखे दिग्दर्शक, निर्मातेही नगरमध्ये घडत आहेत. यू-ट्यूब आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवरही नगरकरांची धूम आहे. त्यांच्या योगदानाचा आढावा या पुस्तकांतून घेतला जात आहे.

नगरचे सर्वच कलाप्रांतात मोठे योगदान आहे. त्यांचा इतिहास खरेतर एका पुस्तकात सामावणार नाही. या उज्ज्वल इतिहासाची नोंद होणे गरजेचे वाटले. त्या उद्देशातून सप्तरंगने हा उपक्रम हाती घेतला आहे.

-डॉ. श्याम शिंदे, अभिनेता, दिग्दर्शक

Web Title: Chanderi History Of Ahmednagar Cine Drama Veterans Theater Area Bollywood

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..