संडे हो या मंडे रोज खाये चिकन और अंडे, कोरोनामुळे लोकं तुटून पडल्याने तुटवडा

सूर्यकांत नेटके
Monday, 28 September 2020

मटणचे दरही गगनाला भिडले आहेत. चिकन, अंडीही महागली आहेत. कॉमन मॅन त्यातल्या त्यात स्वस्त म्हणून चिकन आणि अंड्याला पसंती देत आहे. दररोज रतीब लावल्यासारखे मांसाहार केला जात आहे.

नगर ः कोरोनामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. व्यवसाय बसले. पोल्ट्री फार्ममालकांवरही सुरूवातीच्या काळात ही आपत्ती आली होती. परंतु ती अफवा दूर झाल्याने बहुतेकजण मांसाहारावर तुटून पडला आहे. मटणचे दरही गगनाला भिडले आहेत. चिकन, अंडीही महागली आहेत. कॉमन मॅन त्यातल्या त्यात स्वस्त म्हणून चिकन आणि अंड्याला पसंती देत आहे. दररोज रतीब लावल्यासारखे मांसाहार केला जात आहे.

कोरोना पार्श्वमीवर रोगप्रतिकारशक्ती वाढीला फायदेशीर असल्याने अंडे, चिकन खाण्याचे प्रमाण वाढले. राज्यात अंडे, चिकनला तीन महिन्यांपासून वीस ते पंचवीस टक्के मागणी वाढली आहे. राज्यात आजमितीला दररोज साधारण अडीच कोटी अंड्याची मागणी आहे. मात्र, राज्यात 80 लाख अंड्याचे दर दिवसाला उत्पादन होतेय. तर एक कोटी ते एक कोटी वीस लाख अंडीत परराज्यातून येत आहेत. पन्नास हजार अंड्यांची तूट आहे. चिकनच्या अधिकच्या मागणीमुळे घाऊक व किरकोळ दरात तेजी आहे. 

कोरोनाच्या आधी दररोज राज्यात साधारण दोन कोटी अंड्याची मागणी होती. आता ही मागणी आडीच कोटीवर गेली. दर दिवसाला साधारण 80 लाख अंडी उत्पादीत होतात. शिवाय एक कोटी वीस लाखाच्या जवळपास अंडी तेलंगणा, कर्नाटक, तामिळनाडू राज्यातून येतात.

सध्या पन्नास लाख अंड्याची तूट आहे. मागणी वाढल्याने दरात घाऊकमध्ये साधारण दीड ते दोन रुपयांनी तेजी झाली आहे. पूर्वी तीन ते सव्वा तीन रुपयाला विकणारे अंडे आता पाच ते सव्वा पाच रुपयाला विकले जात आहे. त्यामुळे किरकोळ बाजारात प्रती अंड्याचे दर सात रुपये झाले आहेत. 

बॉयलर चिकनसह गावरान चिकनलाही मागणी वाढली आहे. घाऊक बाजारात साधारण सत्तर ते नव्व्द रुपये किलो दराने विकले जाणारे बॉयलर चिकन सध्या 130 रुपयापर्यंत घाऊक व 180 ते 200 रुपये प्रती किलो दराने विकले जाते. गावरान चिकनचे दरही घाऊकमध्ये 150 ते 170 आहेत. किरकोळ दर 300 रुपये किलोच्या घरात आहेत. 

 

कोरोनावर औषध नसल्याने शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढविण्याबाबत डॉक्‍टर सांगतात. अंडी खाल्ल्याने सर्वाधिक प्रतिकारशक्ती वाढते हे स्पष्ट झाल्याने लोकांची मागणी वाढली आहे. लोकांना अंडी खाल्ली पाहिजेत हे त्यातून स्पष्ट झाले आहे. सध्या अंड्याला काही प्रमाणात तेजी आली असली तरी अफवेच्या काळात मोठे नुकसान झाले ते सहज भरून निघणारे नाही. 
- श्याम भगत, अध्यक्ष, अंडी उत्पादक समन्वय समिती, महाराष्ट्र 
 

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chicken and egg prices increased