श्रीरामपूर पालिकेला मुख्य कार्यकारी अधिकारीच टिकेना

गौरव साळुंके
Thursday, 24 December 2020

पालिकेत मागील सर्वसाधारण सभेवेळी तत्कालीन मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ढेरे रजेवर असल्याने प्रभारी मुख्याधिकारी म्हणून शिर्डी येथील काकासाहेब डोईफोडे सभेला उपस्थित होते. त्यांनी काही दिवस पालिकेचे कामकाज पाहिले.

श्रीरामपूर ः येथील नगरपालिकेचे मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ढेरे यांची नुकतीच ठाणे महापालिकेच्या उपायुक्त पदावर बढती झाली आहे. त्यांच्या जागेवर गणेश शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली. ते अक्कटकोट येथील पालिकेचे मुख्याधिकारी होते.

मुख्याधिकारी शिंदे यांच्या नियुक्तीचे आदेश नगरविकास विभागाचे उपसचिव कैलास बधाण यांनी काढले आहे. आज त्यांनी येथील नगरपालिकेचा पदभार स्वीकारला. गेल्या चार वर्षांत येथील नगरपालिकेला तब्बल सात मुख्याधिकारी मिळाले असले तरी शहरातील विविध प्रश्न अद्याप प्रलंबित आहे. पालिकेच्या मुख्याधिकारी पदाच्या खुर्चीवर अद्याप एकही अधिकारी वर्षभराचाचा कालावधी पूर्ण करु शकलेला नाही.

मुख्याधिकारी पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर शहरातील विविध प्रश्न जाणून घेण्यापूर्वीच बदली होते. त्यामुळे नागरी सुविधांचे विविध कामे रखडली जातात. सध्या शहर परिसरातील सार्वजनिक पाणीपुरवठ्यासह शहर स्वच्छता आणि अतिक्रमणासह विनापरवाना बांधकामांचा प्रश्न रखडला आहे.

हेही वाचा - अण्णांच्या मनधरणीसाठी संकटमोचन महाजन राळेगणसिद्धीत

पालिकेच्या घनकचरा कामांचा संबधीत ठेकेदार काम अर्धवट सोडून पळाल्याने कंत्राटी सफाई कामगारांचे वेतन रखडले आहे. नाईलाजाने पालिकेचा आरोग्य विभागसह काही रोजंदारी सफाई कामगार स्वच्छतेचे काम करीत आहे. परंतु शहर परिसर मोठा असून पुरेशा मनुष्यबळाअभावी शहर स्वच्छ ठेवणे पालिकेसमोर मोठे आव्हान आहे. त्यात पालिकेचे मुख्याधिकारी वारंवार बदलत असल्याने शहरातील अनेक प्रश्न मागे पडत आहे.

पालिकेत मागील सर्वसाधारण सभेवेळी तत्कालीन मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ढेरे रजेवर असल्याने प्रभारी मुख्याधिकारी म्हणून शिर्डी येथील काकासाहेब डोईफोडे सभेला उपस्थित होते. त्यांनी काही दिवस पालिकेचे कामकाज पाहिले.

सार्वजनिक पाणीपुरवठ्याची समस्या, अतिक्रमण आणि विनापरवाना बांधकामांसह दिवाळीच्या बाजारपेठेतील स्टाॅलचे थक्कीत भाडे व्याजासह वसूल करणार असल्याचे त्यांनी जाहिर केले. परंतू रजा संपल्यानंतर मुख्याधिकारी ढेरे यांनी प्रभारी मुख्याधिकारी डोईफोडे यांच्याकडील पदभार आपल्या हाती घेतला. त्यामुळे आजही दुषित पाणीपुरवठ्याची ओरड कायम आहे.

शहरातील विनापरवाना बांधकामासह दिवाळीच्या बाजारपेठेतील स्टाॅलचे भाडे व्याजासह वसूलीचा प्रश्न अद्याप प्रलंबित आहे. येथील नेवासा-संगमनेर रस्ता दुभाजकांसह गोंधवणी परिसरातील रस्ता दुभाजकांमध्ये सर्रास कचरा टाकला जातो. त्यामुळे अनेक रस्ता दुभाजकांना कचराकुंड्यांचे स्वरुप आल्याचे दिसते. त्यामुळे नुतन मुख्याधिकारी शिंदे यांच्याकडुन शहरातील प्रलंबित प्रश्न सुटणार का. अन्यथा स्थानिक परिस्थिती जाणुन घेण्यापुर्वीच त्यांची पुन्हा नेहमीप्रमाणे बदली होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Chief Executive Officer of Shrirampur Municipality did not survive