उद्धव ठाकरे यांनी दिलेला स्वबळाचा नारा ही वादळापूर्वीची शांतता

सकाळ वृत्तसेवा
Friday, 30 October 2020

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी बाबरी मशीद पाडल्यानंतर ती माझ्या शिवसैनिकांनी पाडली असे सांगितले होते.

अहमदनगर : शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी बाबरी मशीद पाडल्यानंतर ती माझ्या शिवसैनिकांनी पाडली असे सांगितले होते. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडले आहे. सत्ता टिवण्यासाठी त्यांनी सगळी तत्वे गुंडाळून ठेवली आहेत, अशी टिका भाजपचे नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. 

जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांना भेटण्यासाठी विखे पाटील आले होते. त्यानंतर त्यांनी महाविकास आघाडी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टिका केली. आमदार विखे म्हणाले, शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेला स्वबळाचा नारा ही वादळापूर्वीची शांतता असू शकते. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी बाबरी मशीद पाडल्यानंतर ती माझ्या शिवसैनिकांनी पाडली असं गर्वाने सांगितलं होतं. मात्र उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं आहे. तसंच सत्ता टिकवण्यासाठी सगळी तत्वे गुंडाळून ठेवली आहेत. केंद्र सरकारवर टीका करणं म्हणजे स्वतः चं अपयश झाकायचं आणि केंद्राकडे बोट दाखवायचं असा प्रकार आहे. तुमच्यात राज्य चालवायची धमक आहे तर मग केंद्राकडे बोट का दाखवता? असाही प्रश्नही त्यांनी केला आहे.

महाराष्ट्रात शिवसेनेचा एकहाती भगवा फडकेल या दृष्टीने आत्तापासूनच तयारीला लागा, असे आवाहन उद्धव ठाकरेंनी जिल्हाप्रमुखांना दिले होते. यावर राष्ट्रवादीचे शरद पवार म्हणाले होते, शिवसेनेचा भगवा फडकवा हे भाषण मी ३० ते ३५ वर्षे ऐकतोय आहे. पक्षाच्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करण्याची ही पद्धत आहे. मंदिरं उघडण्याच्या मुद्द्यावरही विखे पाटील आक्रमक झाले होते.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chief Minister Uddhav Thackeray has left Hindutva