कुंभारवाड्यावर चिनी ड्रॅगनचा हल्ला, दिवाळीचे मार्केटही खाल्ले

शांताराम काळे
Thursday, 5 November 2020

बाजारात चिनी पणत्या आल्या आहेत. विविध प्रकारच्या माळाही चिनी बनावटीच्या आहेत. अगदी आकाशकंदीलही त्यांनी वेगळ्या प्रकारचे आणले आहेत.

अकोले : दिवाळी म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे आणि असत्याकडून सत्याकडे नेणारा सण... पणत्यांची आरास हे दिवाळीचे खास वैशिष्ट्ये, नरकासुर प्रतिमा दहन केल्यानंतर घरोघरी पणत्या प्रज्ज्वलित करण्यात येतात. मात्र, अलीकडे तरुणाई लाईटच्या झगमगाटात वावरत असली तरी आजच्या बदलत्या युगातही पणतीचे महत्व कमी झालेले नाही. मात्र, अकोले कुंभारवाड्यात पूर्वी जशी पणतीसाठी धावपळ उडायची. मात्र, त्या पारंपारीक व्यवसायाला उतरती कळा आली आहे.

बाजारात चिनी पणत्या आल्या आहेत. विविध प्रकारच्या माळाही चिनी बनावटीच्या आहेत. अगदी आकाशकंदीलही त्यांनी वेगळ्या प्रकारचे आणले आहेत. त्या पणत्या व चिनी माळांनी पारंपरिक व्यावसायावर घाव घातला आहे. त्या वस्तू स्वस्त असल्याने भारतीय लोक त्याला पसंती देत होते. परिणामी अनेक कुटुंब देशोधडीला लागले आहेत.

पणती व्यवसायातील अडचणी व तरुण पिढीच्या अनास्थेमुळे व्यवसाय बंद पडण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे कुंभार समाज लक्ष्मी बनविण्याचे काम करत आहे. मातीच्या पणत्याची जागा चिनी माती, प्लास्टिक व मेणबत्तीने घेतली तर विजेच्या पणत्या बाजारात आल्याने मातीच्या पणत्या इतिहास जमा होताना दिसत आहेत. 

वैशाली भालेराव म्हणाल्या की, आमचा कुंभारवाडा पूर्वी पणत्या पुरविण्यासाठी प्रसिद्ध होता. मात्र, गेल्या सात आठ वर्षांपासून व्यवसायाला उतरती कळा लागली. त्यामुळे आम्ही लक्ष्मी मूर्ती बनवण्यासाठी वळलो. त्यात शाडू मातीला भाव वाढल्याने मूर्ती विकण्यास परवडत नाही, ग्राहक जादा किंमत देण्यास नाक मुरडतो.

अकोलेतील कलाबाई भालेराव म्हणाल्या की, राजूर परिसरातील सर्व देवस्थानाला आमचा कुंभारवाडा पणती पुरवायचा अलीकडे मात्र, पणत्या घेत नाहीत. मातीचा भाव वाढल्याने आम्ही व्यवसाय बदलून पणती ऐवजी लक्ष्मी बनवतो. 

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chinese dragon attacks rural pottery business