Success Story ः एकदाच लागवड खर्च, दरवर्षी फक्त नोटा छापायच्या! कोपरगावच्या शेतकऱ्याची अनोखी फळबाग

मनोज जोशी
Tuesday, 15 December 2020

जून ते नोव्हेंबरपर्यंत झाडाला फळे येतात. झाडाला मोठी फुले येत असल्याने शेतकरी मधमक्षिका पालन सारखा दुय्यम धंदा करू शकतात. शरीरातील पांढऱ्या पेशीसह रक्त वाढणे, रोग प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी हे फळ फायदेशीर आहे.

कोपरगाव : ज्वारी, बाजरी, गहू, कापूस, उडीद असे पारंपरिक उत्पादन घेण्याकडे आपल्या शेतकऱ्यांचा कल असतो. बागायतदार द्राक्ष, ऊस नाहीतर केळी यावरच भर असतो. अलिकडे सीताफळ वगैरे लागवड करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. काही तरूण शेतकरी तर वेगवेगळे प्रयोग करीत आहेत. त्यामुळे त्यांना शेती आतबट्ट्याची न वाटता मोठे उत्पादन देणारी इंटस्ट्री वाटते. 

कोणत्याही फळबागेपेक्षा निश्चित फायदेशीर

कमी श्रम, कमी पाणी, एकदाच भांडवली गुंतवणूक, रासायनिक फवारणीचा खर्च शून्य, पुढील 25 वर्षे येणारे फळ, वाढती मागणी व चांगला भाव मिळत असल्याने कान्हेगाव येथील शेतकरी लाखोंची कमाई करीत आहे. विश्वनाथ रामकृष्ण चौधरी असे या प्रगतिशील शेतकऱ्याचे नाव. असं कोणतं फळ आहे बरं...

सव्वा एकरात सहा लाख खर्च केला

इतर शेतकऱ्यांनीही आपल्याप्रमाणेच वेगळी वाट चोखळावी व शेतीव्यवसाय करावा, असे आवाहन चौधरी करतात. चौधरी म्हणाले, की आपण 1985पासून द्राक्षउत्पादन घेत होतो. मात्र, गेल्या वर्षी सव्वा एकरावर ड्रॅगन लागवड केली. त्यासाठी सुरुवातीला सहा लाख रुपयांची गुंतवणूक केली. 612 खांब लावले. कलकत्ता येथून आणलेले रोप प्रत्येक खांबाच्या आधाराने लावले.

२५ वर्षे फळ लगडणार

यावर्षी तीन लाखांचे उत्पन्न झाले. त्याला पुढील 25 वर्षे फळे येत राहतील. त्यास कुठल्याही रासायनिक औषधांची फवारणी करावी लागत नाही. सेंद्रिय खते वापरली, झाडाला काटे असल्याने जनावरे त्रास देत नाहीत. टीव्हीवरील यशकथांमधून या फळशेतीची प्रेरणा मिळाली. ड्रॅगनच्या या बागेला तसा काहीच खर्च नाही. केवळ पाणी देत रहायचं. थोडीफार मशागत केली की पैसाच पैसा.

मेक्सिकोचे वाण

ड्रॅगन फ्रूटचे हे वाण मेक्सिकोचे आहे. कोलकात्याहून आणल्यावर इथल्या शास्त्रज्ञांनी त्यावर प्रक्रिया केली. त्यामुळे या फळात आणखी गोडी आली आहे. कोपरगावात पाच ते सहा शेतकऱ्यांनी ही फळबाग लावली आहे.

हेही वाचा - एका ओट्याने कर्डिले-तनपुरे गटात लावली भांडणं

जोडधंदा म्हणून मधुमक्षिका पालनही करता येईल

जून ते नोव्हेंबरपर्यंत झाडाला फळे येतात. झाडाला मोठी फुले येत असल्याने शेतकरी मधमक्षिका पालनसारखा दुय्यम धंदा करू शकतात. 
शरीरातील पांढऱ्या पेशीसह रक्त वाढणे, रोग प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी हे फळ फायदेशीर आहे.

२०० रूपये किलोप्रमाणे विक्री

पुण्या-मुंबईसह स्थानिक बाजारपेठेत त्याला मोठी मागणी आहे. स्थानिक बाजारात 200 रुपये किलोने माल विकला. या सर्व झाडांची लागवड व निगा नातू कुणाल चौधरी पाहत असल्याचे त्यांनी सांगितले. 

वादळी वारा, अवकाळी पाऊस, अतिवृष्टीचा इतर पिकांच्या तुलनेत ड्रॅगनवर कमी परिणाम होतो. भविष्यात या झाडांची रोपे तयार करणार आहोत. कमी पाण्यात जास्त उत्पन्न मिळते. आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरणाऱ्या युवकांना मोफत मार्गदर्शन करणार आहोत. 
- विश्वनाथ चौधरी, कान्हेगाव, कोपरगाव 

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chinese Dragon Fruit Makes Millions of Kopargaon Farmers