एक ओटा ठरला तनपुरे-कर्डिले गटाच्या संघर्षाचे कारण

विलास कुलकर्णी
Tuesday, 15 December 2020

तनपुरे गटाच्या ताब्यात असलेल्या म्हैसगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या गोदामाला समोरील ओटा पाडल्याचा आरोप सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी केला.

राहुरी : म्हैसगाव येथे राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे व माजी आमदार शिवाजी कर्डिले गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये वादाची ठिणगी पडली. शिवीगाळ करुन मारहाण केल्याप्रकरणी कर्डिले गटाच्या एका कार्यकर्त्याने तनपुरे गटाच्या सहा कार्यकर्त्यांवर राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. 

नानासाहेब खंडेराव हांडे, शशिकांत खंडेराव हांडे, अशोक सखाराम हांडे, खंडेराव गजाराम हांडे, बापूसाहेब भागवत गागरे, जयराम कोंडाजी दाते (सर्वजण रा. म्हैसगाव) अशी आरोपींची नावे आहेत. 

म्हैसगाव येथे विशेष ग्रामसभेत तनपुरे गटाचे लोकनियुक्त सरपंच महेश गागरे यांच्यावरील अविश्वास ठराव मंजूर झाल्यानंतर राजकीय वातावरण तापले आहे. ग्रामपंचायतीचा कारभार कर्डिले गटाच्या ताब्यात गेला. कर्डिले गटाचे अरुण पवार यांनी ग्रामपंचायत रस्त्यावर भर टाकली.

हेही वाचा - देवदैठणच्या सराफाची लुटली तीन किलो चांदी

या वेळी तनपुरे गटाच्या ताब्यात असलेल्या म्हैसगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या गोदामाला समोरील ओटा पाडल्याचा आरोप सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी केला. त्यातून, दोन्ही गटांमध्ये रविवारी (ता. 13) रात्री नऊ वाजता जोरदार भांडण जुंपले.

याप्रकरणी अरुण एकनाथ पवार (वय 45, रा. म्हैसगाव) यांनी राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. तीत म्हंटले की, "ग्रामपंचायतीच्या रस्त्यावर भर टाकल्याच्या कारणावरून, आरोपींनी माझ्या शर्टची कॉलर पकडून तोंडात चापट्या मारीत जमिनीवर ढकलून दिले.

पत्नी सुजाता, मुलगा राहुल व अनिल पवार भांडण सोडविण्यासाठी आले असता. त्यांनाही आरोपींनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. जीवे ठार मारण्याची धमकी दिली." 

अहमदनगर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The minor cause was the Tanpure-Kardile faction's conflict