
श्री घोडेश्वरी देवीच्या मंदिरातील चांदीचे दागिने चोरीच्या घटनेला महिना होत आला तरी पोलिसांना चोरट्यांचा तापास लागला नाही.
नेवासे (अहमदनगर) : श्री घोडेश्वरी देवीच्या मंदिरातील चांदीचे दागिने चोरीच्या घटनेला महिना होत आला तरी पोलिसांना चोरट्यांचा तापास लागला नाही. याबाबत आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी घोडेगाव (ता. नेवासे) ग्रामस्थांची सोनईचे पोलिस अधिकाऱ्यांच्या उपस्थीतीत मंदिरात बैठक झाली. त्यात तापासाबाबत नाराजी व्यक्त करत पुन्हा एकदा 'रास्ता रोको' आंदोलनाचा निर्णय घेतला.
दरम्यान बैठकीत उपस्थित पोलिस अधिकाऱ्याने ग्रामपंचायत निवडणूक आचारसंहितेचे कारण सांगत आंदोलन करता येणार नाही, अन्यथा गुन्हे दाखल होतील असा इशारा देताच संतप्त ग्रामस्थ व पोलिस अधिकाऱ्यांत शाब्दिक चकमक उडाली. त्यामुळे पुन्हा एकदा घोडेगाव येथे नगर- औरंगाबाद महामार्गावर रास्तारोको आंदोलन होणार आहे. या आंदोलनाबाबत ग्रामस्थांनी पोलिसांना निवेदनही दिले आहे.
नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
घोडेगाव येथील श्री घोडेश्वरी देवीच्या मंदिराच्या गाभार्याचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी चांदीचे दागिने चोरून नेलेची घटना १९ नोव्हेंबरीला घडली. या घटनेला महिना होत आला आहे. सोनई पोलिसांनी एका संशयित आरोपीला अटक केली होती. न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. पण पोलिस कोठडी मिळवूनही या संशयित आरोपिकडून पोलिसांना काहीच निष्पन्न झाले नाही. तसेच चोरी गेलेले दागिने सापडलेले नाहीत.
ग्रामस्थांनी १ डिसेंबरला चुल व गावबंद ठेवून घोडेगाव चौफुला येथे रास्ता रोको आंदोलन केले होते. त्यावेळी संशयित आरोपी ताब्यात घेतल्याचे सांगून पोलिसांनी आंदोलन मागे घेण्याची विनंती केली होती. याला पंधरा दिवस होत आले असले तरी अजूनही याप्रकरणात चोराचा आणि दागिन्यांचा तपास लागलेला नाही. त्यामुळे घोडेगाव ग्रामस्थानी पुन्हा आंदोलनाचा निर्धार केला आहे.
अशी उडाली शाब्दिक चकमक..!
या बैठकीस उपस्थित असलेले सोनईचे सहायक पोलिस निरीक्षक रामचंद्र कर्पे यांनी "ग्रामपंचायत निवडणूकमुळे आचारसंहिता लागू असल्याने आंदोलन करु नका, असे आवाहन करत जर आंदोलन केले तर तुमच्यावर गुन्हे दाखल करावे लागतील असा इशारा दिला. त्यानंतर बैठकीत एकाच गोंधळ उडाला. पोलिसांना चोर सापडत नाहीत, दागिने सापडत नाहीत आणि ग्रामस्थांवर गुन्हे दाखल करण्याचा धाक दाखवला जातो. यावरून ग्रामस्थांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. चोर आणि दागिने शोधून आणायचे सोडून पोलिस गुन्हे दाखल करायचे म्हणत असतील तर सर्वांवर गुन्हे दाखल करा, असे आव्हानही यावेळी देण्यात आले.
संपादन : अशोक मुरुमकर