esakal | दाखल्यांवर मिळेना अधिकाऱ्याचा शिक्का; चकरा मारून जनता त्रस्त
sakal

बोलून बातमी शोधा

Stamp

दाखल्यांवर मिळेना अधिकाऱ्याचा शिक्का; चकरा मारून जनता त्रस्त

sakal_logo
By
टीम ई सकाळ

शेवगाव (जि. नगर) : तहसील कार्यालयातून देण्यात येणाऱ्या दाखल्यांसाठी राबविण्यात येणारी ऑनलाइन प्रक्रिया नायब तहसीलदारांच्या ठसे प्रमाणीकरणाअभावी ठप्प झाली आहे. त्यामुळे अनेक चकरा मारूनही दाखले मिळत नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत, तसेच अनेकांची कामे खोळंबली आहेत. (citizens are distressed as they do not get the official seal on the certificates in shegaoan)

तहसील कार्यालयामार्फत शासनाच्या विविध योजनांसाठी, विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवेशासाठी व सवलतीसाठी लागणारे दाखले दिले जातात. त्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता व कार्यालयीन प्रक्रिया शासनाच्या सेतू सुविधा केंद्रामार्फत संबंधितांकडून पूर्ण करून घेतली जाते. ऑनलाइन पद्धतीने चालणाऱ्या या कामकाजासाठी नायब तहसीलदारांचा ठसा डिजिटल स्वाक्षरी म्हणून संगणकीय प्रणालीमध्ये वापरला जातो. सध्या नायब तहसीलदार मयूर बेरड यांचा प्रमाणित असलेला ठसा मुदत संपल्याने कालबाह्य झाला आहे. तसेच, दुसऱ्या नायब तहसीलदारांचा ठसा प्रमाणीकरणासाठी कार्यालयीन प्रक्रिया पूर्ण करून पाठविण्यात आला आहे. मात्र, कोरोना संकटामुळे या प्रक्रियेस दोन-तीन महिन्यांचा विलंब झाला आहे. त्यामुळे अनेक महिन्यांपासून लाभार्थींचे ऑनलाइन दाखले व प्रमाणपत्रे रखडली आहेत. लाभार्थींना ऑफलाइन पद्धतीने दाखले देण्यात येत असले, तरी विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवेशासाठी ऑनलाइन प्रमाणपत्रे आवश्यक असल्याने, त्यांच्या प्रवेशाचा तिढा निर्माण झाला आहे.

याबाबत तहसील कार्यालयात चौकशीसाठी गेलेल्या नागरिकांना उडवाउडवीची उत्तरे देऊन परत पाठविले जाते. ही प्रक्रिया कधी सुरू होईल, याबाबत माहिती नसल्याने, अनेक लाभार्थींना अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेकांची कामे रखडली आहेत. त्यातच दहावी व बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांची गैरसोय होणार आहे. त्यामुळे तत्काळ ऑनलाइन दाखले देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.

ठसाप्रमाणीकरणासाठी लागणारी कार्यालयीन प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. लवकरात लवकर ऑनलाइन दाखल्यांचे वितरण करण्यात येईल.

- मयूर बेरड, नायब तहसीलदार, शेवगाव

(citizens are distressed as they do not get the official seal on the certificates in shegaoan)

हेही वाचा: नगर जिल्ह्यात १३३ गावांमध्ये दीड वर्षांनी वाजली शाळेची घंटा

loading image