esakal | श्रीगोंदे : रिक्त पदांमुळे महावितरणमध्येच अंधार; ग्राहकांची होतेय लूट
sakal

बोलून बातमी शोधा

महावितरण

श्रीगोंदे : रिक्त पदांमुळे महावितरणमध्येच अंधार

sakal_logo
By
संजय आ. काटे

श्रीगोंदे (जि. अहमदनगर) : तालुक्यात श्रीगोंदे व बेलवंडी या दोन उपविभागांतर्गत महावितरणचा कारभार सुरू आहे. तालुक्यात महावितरणला ७८ अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदे असली, तरी प्रत्यक्षात केवळ १७ जण कामावर असल्याने, या रिक्त पदांमुळे महावितरणमध्येच अंधार झाला आहे. हस्तक्षेप करणाऱ्या बाहेरच्या लोकांची संख्या वाढल्याने, महावितरण अशाच लोकांच्या हाती गेल्याने अधिकाऱ्यांना सोयीचे झाले आहे. तालुक्यात अनेक ठिकाणी विजेचा खेळखंडोबा होत आहे. जिल्ह्यात ऊर्जा राज्यमंत्री असतानाही महावितरणची ही अवस्था आहे.

तालुक्यातील कुकडी, विसापूर, घोड या धरणांसह भीमा व इतर नद्यांमुळे सिंचन क्षेत्र चांगलेच वाढले. मनसोक्त विंधनविहिरी घेतल्या जात असल्याने वीजजोड अर्थात आकडा टाकून घेतला जातो. त्यातच शेतकऱ्यांनी केलेली वीजजोड व रोहित्र देण्याची मागणीही मोठी असल्याने, महावितरण त्याला अपुरे पडते.

तालुक्यात चारशे कोटींवर कृषी पंपांची थकबाकी असल्याची माहिती समजली. दरम्यान, महावितरणला ७८ पदांची गरज असताना कामावर १७ जण आहेत. यामुळे अवमेळ होत आहे. श्रीगोंद्यात सोळा वायरमनची गरज असताना प्रत्यक्षात केवळ दोनच जण कामावर असल्याने शहरात अनेकदा अंधार असतो.

महावितरणचा सगळाच कारभार आउटसोर्सिंगवर (कंत्राटी कामगार) सुरू आहे. ज्यांना वीजपुरवठा बंद करण्याचाही अधिकार नाही, त्यांच्याकडून सगळी कामे करून घेतली जात आहेत. अनेक ठिकाणी नियमानुसार वीजपुरवठा होत नाही. कृषी पंपांचे मीटर नावालाच असून, त्याचे मीटर रीडिंग तपासले जात नाही. मध्यंतरी बसविलेल्या रोहित्रांमध्ये अनेकांनी हात ओले केल्याची चर्चा आहे. जिल्ह्यात ऊर्जा राज्यमंत्री असतानाही याकडे दुर्लक्ष होत असल्याने अनेकांचे फावले आहे.

हेही वाचा: 'छातीवर बसून एफआरपी घेऊ' - राजू शेट्टी

नवउद्योजकांचा कोंडमारा

मढेवडगाव ते चिंभळे परिसरात उच्चशिक्षित तरुणांनी आठ विविध कंपन्या सुरू केल्या. मात्र, मढेवडगाव उपकेंद्रांतर्गत येणाऱ्या चार ते पाच गावांत कुठेही बिघाड झाला, की सगळा वीजपुरवठा बंद होतो. त्यामुळे या नवउद्योजकांचा कोंडमारा सुरू आहे. ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याकडे हे गाऱ्हाणे गेले, मात्र त्यांनी ते गांभीर्याने न घेतल्याने तेथे सुरू झालेले उद्योग बंद पडण्याची भीती आहे.


मढेवडगाव परिसरात तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता उद्योग-व्यवसाय उभारले आहेत. लाखो रुपयांची गुंतवणूक करूनही वीज गायब होण्याचे प्रमाण मोठे असल्याने, त्यांच्यावर संकट ओढवले आहे. यावर तोडगा निघावा.
- नंदकुमार गाडेकर, उद्योजक, शिरसगाव बोडखा, श्रीगोंदे

हेही वाचा: डोळ्यांसमोर जन्मदात्रीचा अंत; चिमुरड्यांच्या आकांताने परिसर सुन्न

loading image
go to top