esakal | नाशिक : डोळ्यांसमोर जन्मदात्रीचा अंत; चिमुरड्यांच्या आकांताने परिसर सुन्न
sakal

बोलून बातमी शोधा

mother dies in train accident in front of daughter in nandgaoan

डोळ्यांसमोर जन्मदात्रीचा अंत; चिमुरड्यांच्या आकांताने परिसर सुन्न

sakal_logo
By
संजीव निकम

नांदगाव (जि. नाशिक) : भल्या पहाटे दर्शनासाठी गेलेल्या स्वाती शिंदे यांना परतत असताना काळरूपी धावून आलेल्या महाराष्ट्र एक्स्प्रेसने धडक दिली अन्‌ काही क्षणात होत्याचे नव्हते झाले. डोळ्यांसमोर आईचा करुण अंत बघून तिघा चिमुरड्यांच्या आकांताने अवघी वस्ती सुन्न झाली.

पोटाची खळगी भरण्यासाठी पुण्याला गेलेल्या रवी शिंदे यास गेल्या वर्षी कोरोनामुळे उद्‌भवलेल्या परिस्थितीमुळे पुण्यात राहून काय करणार, ही भ्रांत सतावत होती. त्यामुळे त्याला आपले गाव पुन्हा गाठावे लागले. येथील औरंगाबाद रस्त्यावरील बारा बंगल्यामागील नवीन वस्तीत तो घरी आला अन्‌ जगण्यासाठी रिक्षा चालवू लागला. पत्नी स्वाती शिंदेही पतीला हातभार लावत संसाराचा गाडा हाकू लागली. कष्टाळू गरीब कुटुंबातील स्वाती देवभोळी… त्यात ग्रामदैवत असलेल्या एकविरेच्या मंदिरात भल्या पहाटे आपल्या तिघा चिमुरड्या लेकींसह शेजारच्या सुवर्णा मोरेसोबत दर्शनाला जाऊन आली आणि माघारी फिरताना सब वेत पाणी साचलेले असल्याने रेल्वेरुळाच्या बाजूने घराकडे जात असताना तिच्यासमोर वेगाने आलेल्या महाराष्ट्र एक्स्प्रेसच्या रूपाने काळ धावून आला.

हेही वाचा: नांदगाव : सबवेचा पहिला बळी; रेल्वेखाली सापडून भाविक महिला ठार

गाडीच्या धक्क्याने स्वातीला क्षणात मृत्यूने गाठले. डोळ्यादेखत आई रेल्वेखाली गेल्याचे बघून सोबत असलेल्या लेकींच्या आकांताने परिसरात नागरिकांची धावाधाव झाली. नगरसेवक नितीन जाधव याच सुमाराला मुंबईला जाण्यासाठी त्याच रुळाच्या शेजारून जात होते. त्यांच्या डोळ्यांसमोर हा अपघात झाला. या धक्क्यातून त्यांनाही सावरता येत नव्हते. त्यांनी वाचविण्यासाठी आरडाओरड केली; पण उपयोग झाला नाही.

दुपारी स्वातीचा मृतदेह नव्या वस्तीत येताक्षणीच सगळ्या वस्तीवर एकच शोककळा पसरली. सुन्न झालेले शेजारी आणि कुटुंबीयांची जिवाची घालमेल करणारे आक्रंदन काळीज चिरून जात होते. स्वातीला तीन लेकी. मुलगा होईल, या आशेने वाट बघणाऱ्या स्वातीला चौथीही मुलगी झाली. हातावर पोट भरणाऱ्या या कुटुंबाची या घटनेने वाताहत झाली. दर्शनाला गेलेली आई माघारी आता परत येणार नाही, या भावनेने आकांत करणाऱ्या या चिमुरड्यांची झालेली ताटातूट अनेकांना हेलावून गेली.

हेही वाचा: तुमचा स्मार्टफोन ओव्हरहीट होतोय? तर लगेच बदला 'या' सेटींग्ज

loading image
go to top