कोरोनाचा संसर्ग वाढत असतानाही एटीएममध्ये नाहीत पैसे

आनंद गायकवाड
Monday, 28 September 2020

आश्वी बुद्रूक व खुर्द या व्यापारी पेठेच्या गावात ग्राहकांच्या सोईसाठी भारतीय स्टेट बँक व सेंट्रल बँक या राष्ट्रीयकृत बँकेची दोन एटीएम आहेत.

संगमनेर (अहमदनगर) : तालुक्यातील आश्वी बुद्रूक व खुर्द या व्यापारी पेठेच्या गावात ग्राहकांच्या सोईसाठी भारतीय स्टेट बँक व सेंट्रल बँक या राष्ट्रीयकृत बँकेची दोन एटीएम आहेत. या दोन्ही एटीएमची सेवा पूर्णपणे बंद असल्याने, ही सेवा असून अडचण नसून खोळंबा अशी झाली आहे.

एकीकडे राज्यात वेगाने वाढणाऱ्या कोरोना प्रादुर्भावावर शासन प्रभावी उपाययोजना करीत आहे. बँका व इतर ठिकाणी कोरोनाचा प्रचार व प्रसार होवू नये म्हणून, प्रशासनाने कॅशलेस सेवा देण्यावर भर दिला असून, अनेक ठिकाणी बाजारपेठेत यासाठी कॅशलेस प्रणालीचा वापर सुरु आहे. या पार्श्वभुमीवर तालुक्यातील मोठी बाजारपेठ असलेल्या आश्वी बुद्रूक येथील सेंट्रल बँक ऑफ इंडीया व स्टेट बँकेच्या दोन्ही एटीएमची सेवा कोरोना काळातही सुरळीत नव्हती. ही दोन्ही एटीएम बहुतांश बंदच असल्याने, ग्राहकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. यामुळे ही दोन्ही एटीएम असून अडचण, नसून खोळंबा ठरली आहेत.

बँकांच्या सुट्टीच्या दिवसातही थोड्या वेळात पैशांची व्यवस्था करणारी ही व्यवस्था अनेकांसाठी सोयीची आहे. मात्र अनेकदा ही सेवा ठप्प असल्याने, ग्राहकांची होणारी गैरसोय लक्षात घेवून ही दोन्ही एटीएम संबंधित बँकांनी तातडीने कार्यान्वित करुन, त्यांची सेवा सुरळीत करण्याची मागणी ग्राहकवर्गातून होत आहे. आश्वी परिसरातील चिंचपूर, प्रतापपूर, निमगावजाळी, आश्वी बुद्रुक, उंबरी बाळापुर, ओझर, आश्वी खुर्द, पिंप्रीलौकी अजमपुर, शिबलापुर, पानोडी, हजारवाडी, मालुंजे, हंगेवाडी, शेडगाव, मांची आदि गावातील ग्रामस्थांचे आर्थिक व्यवहार आश्वी येथील दोन्ही राष्ट्रीयकृत बँकेत असल्याने, त्यांना दैनंदिन व्यवहारात मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. ही सेवा तातडीने पूर्ववत न झाल्यास दोन्ही एटीएमला कुलूप लावण्याचा इशारा सरुनाथ उंबरकर यांनी दिला आहे.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Citizens problem due to lack of money in ATM in Sangamner taluka