
जिल्ह्यातील विविध कार्यकारी सेवा संस्था, जिल्हा सहकारी बॅंकेसह विविध सहकारी संस्थांच्या निवडणुका येऊ घातल्या आहेत.
नगर ः जिल्ह्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे सचिव यशवंत गिरी यांनी मोकळा केला.
गिरी यांच्या आदेशानुसार, जिल्हा निवडणूक आराखड्यानुसार 250 वा त्यापेक्षा कमी सभासद असलेल्या सहकारी संस्था वगळता, अन्य सहकारी संस्थांची निवडणूक घेण्याचा आदेश संबंधित जिल्हा, तालुका व प्रभाग सहकारी निवडणूक अधिकाऱ्यांना दिला आहे.
जिल्ह्यातील विविध कार्यकारी सेवा संस्था, जिल्हा सहकारी बॅंकेसह विविध सहकारी संस्थांच्या निवडणुका येऊ घातल्या आहेत. 28 सप्टेंबर 2020 रोजी राज्य सरकारने कोरोना लॉकडाउनचे कारण देत निवडणुका तीन महिने पुढे ढकलल्या होत्या.
हेही वाचा - पोल्ट्री फार्मचालक आले टेन्शनमध्ये
31 डिसेंबर 2020 रोजी ही मुदत संपली. त्यामुळे निवडणूक प्रक्रिया ज्या टप्प्यावर स्थगित झाली, त्या टप्प्यापासून 18 जानेवारी 2021पासून निवडणुकीकरिता जिल्हा निवडणूक आराखडा तयार करण्यात आला आहे.
या आराखड्यातील पहिल्या टप्प्यातील सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया सुधारित कार्यक्रमाप्रमाणे सुरू करण्याचे आदेश यशवंत गिरी यांनी दिले आहेत. या निवडणूक प्रक्रियेत सामाजिक अंतर राखणे, मास्क वापरणे, सॅनिटायझेशन, थर्मल स्क्रिनिंग आदी उपाययोजनांचा अवलंब करावा, असे आदेश देण्यात आले आहेत.
संपादन - अशोक निंबाळकर