
पाथर्डीतील कोंबड्यांच्या संशयास्पद मृत्यूने कुक्कुटपालक धास्तावले आहेत. आकाशात उडणाऱ्या पक्ष्यांच्या विष्ठेतून 'बर्ड फ्लू'चा संसर्ग होत असल्याने, त्यांच्यापासून पोल्ट्री फार्ममधील पक्ष्यांना धोका होणार नाही याची दक्षता घेण्याची सूचना पशुसंवर्धन विभागाने केली आहे.
कोपरगाव (अहमदनगर) : तालुक्यातील 323 कुक्कुटपालकांकडे 14 लाख 44 हजार कोंबड्या आहेत. मात्र, 'बर्ड फ्लू'च्या भीतीने अंडी, चिकनच्या मागणीत कमालीची घट झाली आहे. दुसरीकडे, पोल्ट्री फार्म उभारण्यासाठी बॅंकेचे घेतलेले कर्ज, रोजच्या खर्चाचा कसा मेळ घालायचा, या विवंचनेतून येथील कुक्कुटपालक आर्थिक संकटात सापडले आहेत. तालुक्यात सर्वाधिक पोल्ट्री फार्म रांजणगाव देशमुख परिसरात आहेत.
अहमदनगरच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा
पाथर्डीतील कोंबड्यांच्या संशयास्पद मृत्यूने कुक्कुटपालक धास्तावले आहेत. आकाशात उडणाऱ्या पक्ष्यांच्या विष्ठेतून 'बर्ड फ्लू'चा संसर्ग होत असल्याने, त्यांच्यापासून पोल्ट्री फार्ममधील पक्ष्यांना धोका होणार नाही याची दक्षता घेण्याची सूचना पशुसंवर्धन विभागाने केली आहे. तालुका लघुपशुचिकित्सालयाचे सहायक पशुसंवर्धन आयुक्त डॉ. अजयनाथ थोरे यांच्या मार्गदर्शनाखाली 'बर्ड फ्लू' रोखण्यासाठी पूर्वतयारी केली आहे. पंचायत समितीचे पशुधन विकास विस्तार अधिकारी डॉ. दिलीप दहे, पशुधन अधिकारी श्रद्धा काटे यांनी स्वतंत्र पाच पशुवैद्यकीय पथके तयार केली आहेत. त्यात पशुधन अधिकारी, दोन पर्यवेक्षक अधिकारी व सहायकांचा समावेश आहे. तालुक्यात पक्ष्यांचा मृत्यू आढळल्यास त्याची तपासणी व वैद्यकीय अहवाल तयार केला जाणार आहे. 'बर्ड फ्लू'चे संकट येण्यापूर्वीच पशुसंवर्धन यंत्रणा सज्ज झाल्याची माहिती डॉ. दिलीप दहे यांनी दिली.
हे ही वाचा : मका खरेदी केंद्रे पुन्हा सुरू होणार
सध्या तालुक्यातील एकाही पोल्ट्री फार्ममधील कोंबड्यांचा मृत्यू या संसर्गजन्य आजाराने झालेला नाही. मात्र, सुरक्षेचा उपाय म्हणून पोल्ट्री फार्मजवळील मोठ्या वृक्षांच्या फांद्या काढाव्यात, बाहेर उडणारे, फिरणारे पक्षी पोल्ट्रीजवळ येऊ देऊ नयेत, अशा सूचना पशुसंवर्धन विभागाने केल्या आहेत.
हे ही वाचा : वृद्धेश्वर कारखान्यासाठी 120 उमेदवारी अर्ज
पोल्ट्री फार्मची स्थिती
- एकूण पोल्ट्री फार्म - 323
- एकूण पक्षी - 14 लाख 44 हजार
- अंडी देणारे - 4 लाख
- मांसासाठीचे - 10 लाख
- गावरान कोंबड्या - 6800
खवय्यांची माशांना पसंती
श्रीरामपूर : जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाने, सोमवारपर्यंत (ता. 18) तालुक्यात पोल्ट्री फार्ममधील पक्ष्यांची तपासणी करून सर्वेक्षण अहवाल सादर करण्याच्या सूचना केल्या आहेत. दरम्यान, शहर परिसरातील हॉटेलमध्ये आता ग्राहक चिकन, अंड्यांऐवजी माशांना पसंती देत आहेत. अनेकजण शाकाहाराकडे वळले आहेत. चिकन, अंड्यांच्या दैनंदिन मागणीत 20 ते 25 टक्क्यांनी घट झाली आहे.
मागील महिन्यात पोल्ट्री फार्मवर दोन किलोची कोंबडी 90 रुपयांना विकली जात होती. आता त्यात 30-40 रुपयांनी घट झाली आहे. याचा आर्थिक फटका पोल्ट्री व्यावसायिकांना बसू लागला आहे. मात्र, पर्याय नसल्याने मिळेल त्या भावात कोंबड्यांची विक्री ते करीत असल्याचे दिसते. बाजारात 160 रुपये किलो असलेला चिकनचा दर आता 120 रुपयांवर आला आहे. अंड्यांच्या दरातही 25 टक्क्यांनी घसरण झाली आहे.