लाचखोरीत पोलिस-महसूलमध्येच स्पर्धा, पोलिसच नंबर वनवर

सूर्यकांत वरकड
Thursday, 14 January 2021

गेल्या चार वर्षांत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 119 सापळे लावून कारवाई केली. त्यात 137 जणांविरुद्ध गुन्हे दाखल झाले.

नगर : विविध कामांसाठी थेट जनतेच्या खिशाला हात घालणाऱ्यांना वठणीवर आणण्याचे काम लाचलुचपत प्रतिबंधक विभाग करतो. या विभागाच्या नगर कार्यालयाने गेल्या चार वर्षांत केलेल्या कारवाईतून, खाबुगिरीत पोलिसच आघाडीवर असल्याचे दिसते. या काळात तब्बल 35 पोलिस लाचलुचपतच्या जाळ्यात सापडले आहेत. 

महसूल आणि पोलिस विभागाशी सामान्य जनतेचा सातत्याने संपर्क येतो. दुर्दैवाने लाचखोरीच्या प्रकरणांत गेल्या चार वर्षांत पोलिस व महसूल विभागांतील अनेकांना जेलची हवा खावी लागली.

गेल्या चार वर्षांत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 119 सापळे लावून कारवाई केली. त्यात 137 जणांविरुद्ध गुन्हे दाखल झाले. त्यात पोलिस, महसूल, जिल्हा परिषद, भूमिअभिलेख, दुय्यम निबंधक, आरोग्य, कृषी, विद्युत, कारागृह, खासगी व्यक्ती, अन्य लोकसेवक, सहकार, ग्रामविकास, न्याय, पाटबंधारे, अन्न व औषध प्रशासन आदी विभागांतील अधिकारी-कर्मचारी जाळ्यात अडकले आहेत. 

हेही वाचा - नाद केला पण अंगलट आला

गेल्या वर्षी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जिल्ह्यात 32 सापळे लावून पोलिस व महसूलसह अन्य विभागांतील 38 जणांना लाचेच्या गुन्ह्यात पकडले. दरम्यान, जिल्ह्यात संगमनेर व जामखेड पोलिस ठाण्यांतील उपनिरीक्षकांना लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पकडल्याचे नुकतेच समोर आले होते. 

खासगी व्यक्‍तींवरही कारवाई 
गेल्या काही वर्षांपासून खासगी व्यक्तींवरही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करण्यास सुरवात केली आहे. दिवसेंदिवस लाचेच्या गुन्ह्यात खासगी व्यक्ती आरोपी होण्याचे प्रमाण वाढले आहे. गेल्या चार वर्षांत 21 खासगी व्यक्ती या प्रकरणात आरोपी झाल्या आहेत. 

वर्षनिहाय स्थिती 
वर्ष सापळा आरोपी 

2017 28 31 
2018 27 27 
2019 32 41 
2020 32 38 

विभागनिहाय कारवाई 
पोलिस - 35 
महसूल - 30 
शिक्षण - 04 
जिल्हा परिषद - 08 
भूमिअभिलेख - 07 

सरकारी कार्यालयांत लोकसेवक लाचेची मागणी करीत असल्यास, मनात शंका न बाळगता तत्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा. तक्रारदाराचे नाव गुप्त ठेवून कारवाई करण्यात येईल. फोनवर तक्रार केली, तरी शहानिशा करून कारवाई करण्यात येते. 
- हरीश खेडकर, पोलिस उपअधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग 
.... 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Competition in bribery police-revenue only, police only number one