पालकमंत्री मुश्रीफ यांच्या दौऱ्यात निवेदनांचाच पाऊस

सचिन सातपुते
Friday, 23 October 2020

जुन महिन्यापासून सुरु असलेल्या पावसामुळे तालुक्यातील पिकांचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे अनेक भागातील पिके हातची गेली आहेत.

शेवगाव: अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आलेल्या पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ यांच्यावर शेवगाव तालुक्यात निवेदनांचा अक्षरश: पाऊस पडला. भाजप, काँग्रेस, शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, जनशक्ती मंच, महिला बचत गट यांच्यासह क्षितीज घुले युवा मंचच्या वतीने ही वेगवेगळ्या मागण्यांकडे पालकमंत्र्यांचे लक्ष वेधले. 

जुन महिन्यापासून सुरु असलेल्या पावसामुळे तालुक्यातील पिकांचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे अनेक भागातील पिके हातची गेली आहेत. या पार्श्वभुमीवर पालकमंत्री ना. मुश्रीफ यांनी झालेल्या नुकसानीचे पाहणी करण्यासाठी शेवगाव व पाथर्डी तालुक्यातील काही गावांची निवड केली. 

काल गुरुवार ता.२२ रोजी त्यांचा दौरा तालुक्यातील पूर्व भागातील शिंगोरी, अंतरवाली, लाडजळगाव, बोधेगाव या गावामध्ये झाला. त्यांनी प्रत्यक्ष बांधावर जावून माजी आमदार चंद्रशेखर घुले, पंचायत समितीचे सभापती क्षितीज घुले, केदारेश्वरचे अध्यक्ष अँड. प्रताप ढाकणे यांच्या समवेत खरीप पिकांची पाहणी केली. मात्र, पाहणी सोबतच रस्त्यावर, गावोगावी थांबलेल्या विविध पक्ष, संघटनेच्या कार्यकर्त्यांनी निवेदने देवून विविध प्रश्नांकडे लक्ष वेधले.

त्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शेतकरी ऊस दरवाढ आंदोलनातील शेतक-यांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यात यावे. तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा यासाठी जिल्हाध्यक्ष स्नेहल फुंदे, तालुकाध्यक्ष प्रशांत भराट, दत्तात्रय फुंदे, बाळासाहेब फटांगरे, प्रविण म्हस्के, संतोष गायकवाड, संदीप मोटकर यांनी निवेदन दिले. 

तालुक्यात सरसकट पंचनामे करुन ओला दुष्काळ जाहीर करावा यामागणीचे निवेदन शिवसेनेचे तालुकाध्यक्ष अँड. अविनाश मगरे, शहराध्यक्ष शितल पुरनाळे, सिध्दार्थ काटे, महेश पुरनाळे, उदय गांगुर्डे यांनी तर भाजपचे तालुकाध्यक्ष ताराचंद लोढे, राजेंद्र डमाळे, संदीप देशमुख, कासम शेख यांनी तर काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अमोल फडके, सुधीर बाबर, प्रकाश तुजारे यांनी तर जनशक्ती मंचच्या वतीने संजय आंधळे, विजय साळवे यांनी दिले. बोधेगाव येथील महिला बचत गटाने व आंतरवाली येथील शेतक-यांनी विविध मागण्या केल्या. 

राष्ट्रवादी काँग्रेसचेच पदाधिकारी असलेल्या पालकमंत्र्याच्या स्वपक्षीय क्षितीज घुले युवा मंचने शेवगाव शहरातील घनकचरा व्यवस्थापन, नगरपरीषदेकडून होणारे निकृष्ट दर्जाचे कामे, वाहतुक कोंडी याबाबत निवेदन देवून आगामी नगरपरीषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर सभापती क्षितीज घुले, संतोष जाधव, समीर शेख, वहाब शेख, विशाल जोशी, कृष्णा सातपुते, रोहीत काथवटे, अमर जाधव, किरण भोकरे, प्रविण भारस्कर, दिपक कुसळकर आदींनी पालकमंत्र्यांचे लक्ष वेधले.
संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Complaints from people during Guardian Minister Mushrif's visit