esakal | मोहटा गडावर नवरात्रोत्सवाची सांगता | Ahmednagar
sakal

बोलून बातमी शोधा

मोहटा गडावर नवरात्रोत्सवाची सांगता

मोहटा गडावर नवरात्रोत्सवाची सांगता

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पाथर्डी : मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत, मात्र उत्साही वातावरणात काल बुधवारी तालुक्यातील मोहटादेवी गडावर अष्टमीचा होम पेटवून नवरात्रोत्सवाची सांगता झाली.

जिल्हा न्यायाधीश सुधाकर यर्लागड्डा व मालती यर्लागड्डा यांच्या हस्ते होमहवन विधी झाला. काल दुपारी अष्टमी होमहवनाला सुरवात झाली. यावेळी वेदमूर्ती नारायणदेवा खोकरमोहकर, राजूदेवा मुळे, भूषण साखरे, रवी देवा जोशी, बाळासाहेब क्षीरसागर यांनी पौरोहित्य केले. कुमारिका पूजन, सुवासिनी पूजन, ओटी भरणे आदी विधी होमहवनाच्या वेळी होऊन देवीचा स्वयंभू तांदळ्यावर गंगाजलाने अभिषेक केला. होम हवनासाठी मोहटा देवस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश मिलिंद कुर्तडीकर, आरती कुर्तडीकर, पाथर्डीचे दिवाणी न्यायाधीश सुशिल देशमुख, अहमदनगरच्या उपवनसंरक्षक अधिकारी सुवर्णा माने, विश्वस्त ॲड. सुभाष काकडे, ॲड. विजयकुमार वेलदे, डॉ. ज्ञानेश्वर दराडे, सुधीर लांडगे, भीमराव पालवे, अशोक दहिफळे, आजिनाथ आव्हाड, मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश भणगे उपस्थित होते.

रांजणगाव गणपती येथील भाविक सचिन दुंडे यांनी देवी गाभारा व प्रवेशद्वारावर आकर्षक फुलांची सजावट केली. अष्टमीचा होम झाल्यानंतर दरवर्षी मोहटा देवी गडावर यात्रा, कलाकारांच्या हजेऱ्या, कुस्त्यांचा फड असे अनेक कार्यक्रम होतात. मात्र, करोना साथरोगाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी इतर कार्यक्रमावर बंदी घातल्याने व गडावर १४४ कलम लागू केल्याने हे कार्यक्रम आता होणार नसल्याचे भणगे यांनी सांगितले.

या शिवाय पाथर्डी शहरातील कालिका, रेणुका, चौंडेश्वरी, गाडगे आमराई, तिळवण तेली समाज मंदिर तसेच तालुक्यातील तिसगाव, धामणगाव, येळी या ठिकाणीही अष्टमीचा होम पेटवून नवरात्रोत्सवाची सांगता झाली.

loading image
go to top