शिर्डीत साईबाबा पुण्यतिथी सोहळ्याची सांगता

सकाळ वृत्तसेवा
Monday, 26 October 2020

उत्सवानिमित्त हैदराबाद येथील साईभक्‍त सुनील शहा यांनी 1500 ग्रॅमची, सुमारे 91 हजार रुपये किमतीची चांदीची परडी साईमंदिराला भेट दिली.

शिर्डी ः साईमंदिराच्या सेवेतील संभाजी तुरकणे यांचे आज काल्याचे साईकीर्तन झाले. मोजक्‍या कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत मुख्य कार्यकारी अधिकारी के. एच. बगाटे यांनी दहीहंडी फोडली. त्यानंतर तीन दिवस चाललेल्या साईबाबा पुण्यतिथी उत्सवाची सांगता परंपरेनुसार झाली.

उत्सवानिमित्त हैदराबाद येथील साईभक्‍त सुनील शहा यांनी 1500 ग्रॅमची, सुमारे 91 हजार रुपये किमतीची चांदीची परडी साईमंदिराला भेट दिली. 
उत्सवाच्या मुख्य दिवशी काल (रविवारी) रूढी-परंपरेनुसार आयोजित प्रतीकात्मक भिक्षाझोळीत साईभक्‍तांनी भरभरून दान केले.

त्यात गहू, तांदूळ, बाजरी, ज्वारी, तूरडाळ, मूगडाळ, मसूरडाळ, हरभरा, हरभराडाळ, रवा, शेंगदाणे, गूळ, साखर, शुद्ध देशी तूप व खाद्यतेल, असा 2 लाख 85 हजार 272 रुपयांचा माल व रोख 70 हजार 308 रुपये, असे एकूण तीन लाख 55 हजार 580 रुपयांचे दान मिळाले. 

गेल्या सात महिन्यांपासून साईमंदिर बंद आहे. सहा हजार कर्मचारी व अधिकारी, असा मोठा व्याप असलेल्या साईसंस्थानचे उत्पन्नाचे स्रोत बंद झाले आहेत. कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या विलंबाने होत असलेल्या वेतनापासून अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. गेल्या सात महिन्यांपासून अधिकारी रोज बैठका घेतात.

सध्या हेच त्यांचे मुख्य काम झाले आहे. काही प्रमाणात साईमंदिर विभाग व रुग्णालय वगळता, अन्य विभागांना कुठलेही काम नाही. पुण्यतिथी उत्सवानिमित्त सलग तीन दिवस नित्याच्या बैठका बाजूला ठेवून धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी अधिकाऱ्यांना मिळाली. 

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Concluding Sai Baba Punyatithi ceremony in Shirdi