लॉकडाउनबाबत संभ्रम! संसर्गाची साखळी तोडण्यासाठी राजकारण तापले

गौरव साळुंके
Sunday, 13 September 2020

कोरोनाचा संसर्ग वाढला असुन उपचारासाठी ऑक्सीजनही कमी पडत आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे उपचारासाठी मर्यादा येत आहे.

श्रीरामपूर (अहमदनगर) : कोरोनाचा संसर्ग वाढला असुन उपचारासाठी ऑक्सीजनही कमी पडत आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे उपचारासाठी मर्यादा येत आहे. शहरातही रुग्णांना बेड मिळणे अवघड झाले आहे.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आणि आपल्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी सर्वांनी एकत्र येत रविवारपासुन (ता. १३) पुढील आठ दिवस स्वतःहुन लॉकडाउनचे पालन करावे, असे आवाहन येथील नगरपालिकेत झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत करण्यात आले. पालिकेत आज पुन्हा सर्वपक्षीय समितीची बैठक पार पडली. कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी सर्वांनी एकजूटीने शहर लाॅकडाउन करण्याचे आवाहन बैठकीत केले आहे.

सार्वजनिक आरोग्यासाठी उद्यापासुन रविवार (ता.२०) पर्यंत स्वयंस्फुर्तीने शहर बंद ठेवण्यासाठी एकमत झाले. नगराध्यक्षा अनुराधा आदिक, रवी गुलाटी, किरण लुणिया, राम टेकावडे, राजेंद्र देवकर, सचिन बडधे, सुभाष त्रिभुवन, रमेश गुंदेचा उपस्थित होते. व्यापारी संघटनेचे अध्यक्ष विशाल पोफळे म्हणाले, शहराच्या हितासाठी कोरोनाची साखळी तोडणे गरजेचे असून त्यासाठी सर्व व्यापारयांनी बंदमध्ये सहभाग घेत गावाचे हित जपावे. अशोक उपाध्ये म्हणाले, लाॅकडाउनसाठी विरोध करण्याची भुमिका गावाच्या विरोधी आहे. गावाच्या हितासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे. आम्ही राजकारण बाजूला ठेवून गावासाठी एकत्र आलो आहोत. श्रीनिवास बिहाणी म्हणाले, शहरात कोरोनाची संख्या झपाट्याने वाढत आहे. घराघरात कोरोना संसर्ग झाला आहे. संसर्गाची साखळी तोडण्यासाठी लाॅकडाउन गरजेचा आहे. लाॅकडाउन मध्ये कुणीही कामगारांचा पगार कपात करु नये. शहर बंद ठेवणे हे सर्वांच्या हिताचे असल्याचे अहमद जहागिरदार यांनी सांगितले.

लॉकडाउनवरुन राजकारण तापले
दुकाने खुली ठेवावीत : मुरकुटे

शहरातील लहानमोठ्या व्यावसायिकांनी उद्यापासुन आपली दुकाने व व्यवसाय नियमितपणे प्रशासनाने दिलेल्या नियमांनुसार आणि वेळेनुसार खुली ठेवावीत. शहर लॉकडाउनसाठी आपला पूर्ण विरोध असून व्यापारयांनी दुकाने बंद ठेवू नये. छोट्या व्यावसायिकांना दुकाणे बंद ठेवण्यासाठी बळजबरी केल्यास आपण त्यांच्या पाठीशी आहोत. असे आवाहन माजी आमदार भानुदास मुरकुटे व माजी नगराध्यक्ष अनिल कांबळे यांनी केले आहे. आज सांयकाळी माजी आमदार मुरकुटे यांनी बाजारपेठेत जावुन व्यापार्यांच्या भेटी घेवुन दुकाने खुली ठेवण्याचे आवाहन केले. कोरोनाबाबत जनतेमध्ये जागरुकता निर्माण झाली आहे. प्रत्येकांने नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. नियमांचे पालन करुन आता कोरोनाशी दोन हात करावे लागणार आहे. दुकाने व व्यवसाय बंद ठेवल्याने सर्वसामान्यांच्या उपासमारीचा प्रश्न निर्माण होतो. गेल्या सहा महिन्यांपासून कोरोनामुळे अनेकांचे व्यवसाय ठप्प होते. परंतू लाॅकडाउन शिथीलतेनंतर बाजारपेठ सुरळीतपणे नियमांचे पालन करुन रुळावर येत आहे. त्यात संसर्गाची साखळी तोडण्यासाठी काहींनी बंदचे आवाहन केले आहे. परंतू बंदसाठी प्रशासनाचा आदेश नसल्याने सर्वांनी नियमांचे पालन करुन दुकाने खुली ठेवावीत. असे आवाहन मुरकुटे यांनी केले.

आता लॉकडाउन गरजेचा : छल्लारे
सध्याची परिस्थिती पक्षाची धोरणे सांगायची नसून नागरीकांचे जीव वाचविण्याची आहे, असे म्हणत काँग्रेसचे शहराध्यक्ष संजय छल्लारे यांनी आमदारांना घरचा आहेर दिला आहे. सार्वजनिक आरोग्यासाठी आपला लाॅकडाउला पाठिंबा आल्याचे छल्लारे यांनी जाहीर केले. सरकारने सर्वत्र अनलॉक लागु केला आहे. सरकारचा प्रतिनिधी असल्याने सरकारचे धोरण तेच माझे धोरण असे आमदार सांगत आहे. शहर लॉकडाउन करण्यासाठी आमदारांनी विरोध दर्शविला होता. याबाबत छल्लारे म्हणाले, कोरोनामुळे रुग्ण मरत आहे. अनेकांना उपचार मिळत नाही. अशा कठिण काळात पक्षाची ध्येयधोरणे सांगण्यापेक्षा लोकांना वाचविणे महत्वाचे आहे. कोरोनाच्या संकटात कोणत्याच पक्षानी आपली ध्येयधोरणे सांगु नये. नागरीकांच्या हितासाठी पालिकेत बैठक आयोजित करुन लाॅकडाउनचा निर्णय झाला. आणि आता जे लाॅकडाउनला विरोध करतात. त्यांनी लाॅकडाउन काळात कुणालाही मदत केली नाही. कोरोनामुळे अनेकांचे मृत्यू झाले असुन कोणीही राजकारण करु नये. सार्वजनिक आरोग्यासाठी सर्वांनी स्वतःहुन लॉकडाउनचे पालन करावे. लाॅकडाउनसाठी कुणावरही बळजबरी नसुन व्यापारी आणि नागरीकांनी योग्य तो निर्णय घ्यावा. असे आवाहन छल्लारे यांनी केले.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Confusion about corona lockdown in Shrirampur