esakal | पगारासाठी कर्मचाऱ्याने दारु पिऊन गाठले रात्री आरोग्य अधिकाऱ्याचे घर
sakal

बोलून बातमी शोधा

Confusion for salaries of Kotul Rural Hospital staff

दारूच्या नशेत तर्र झालेल्या कोतुळ ग्रामीण रुग्णालयातील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याने गुरुवारी (ता. 5) रात्री दहाच्या सुमारास वैद्यकीय अधीक्षकांचे घर गाठले. माझा ऑक्‍टोबरचा पगार का काढला नाही, असा जाब विचारत त्यांच्याशी हुज्जत घालू लागला.

पगारासाठी कर्मचाऱ्याने दारु पिऊन गाठले रात्री आरोग्य अधिकाऱ्याचे घर

sakal_logo
By
शांताराम काळे

अकोले (अहमदनगर) : दारूच्या नशेत तर्र झालेल्या कोतुळ ग्रामीण रुग्णालयातील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याने गुरुवारी (ता. 5) रात्री दहाच्या सुमारास वैद्यकीय अधीक्षकांचे घर गाठले. माझा ऑक्‍टोबरचा पगार का काढला नाही, असा जाब विचारत त्यांच्याशी हुज्जत घालू लागला. वैद्यकिय अधीक्षकांनी त्याची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो समजून घेण्याच्या मनस्थितीत नव्हता. अखेर अधीक्षकांनी पोलिसांत तक्रार करण्याची धमकी देताच, त्याची खाडकन उतरली. वैद्यकीय अधीक्षकांचे पाय धरत, तो माफी मागू लागला. 

कोतुळ ग्रामीण रुग्णालयातील चतुर्थ श्रेणी कर्मचारी गुरुवारी रात्री 10 वाजता दारूच्या नशेत वैद्यकीय अधीक्षकांच्या खोलीवर आला. ऑक्‍टोबर महिन्यातील पगाराबाबत त्याने वैद्यकीय अधीक्षकांना विचारणा केली. त्यावर अधीक्षकांनी सांगितले, की "पगार बिलावर मी सह्या केल्या आहेत. कोषागारातील तांत्रिक अडचणींमुळे पगार झाला नाही. तसेच पगार मागण्याची ही वेळ नाही, सकाळी पाहू..' मात्र, कर्मचारी काहीही ऐकून घेण्याच्या तयारीत नव्हता. एका कर्मचाऱ्याने मध्यस्ती करीत, सकाळी येण्याची विनंती केली असता, मद्यपी कर्मचाऱ्याचा पारा आणखीच चढला. तो त्या कर्मचाऱ्यासोबत गोंधळ घालू लागला. काही जणांनी मध्यस्ती करून त्याला शांत केले. 

वैद्यकीय अधीक्षकांनी अखेर त्यास निर्वाणीचा इशारा देताना, "नाईलाजाने मला पोलिस केस करण्याचा निर्णय घ्यावा लागेल', असे सांगताच कर्मचाऱ्याची नशा क्षणात उतरली. त्याने लगेच वैद्यकीय अधीक्षकांचे पाय धरले. माफी मागत आपली चूक कबूल केली. 
दरम्यान, शुक्रवारी (ता. 6) वैद्यकीय अधीक्षकांनी त्यास शिस्तभंगाबद्दल "कारणे दाखवा' नोटीस बजावली असून, पाच दिवसांत खुलासा मागितला आहे. वैद्यकीय

अधिकाऱ्यांबरोबर पगारावरून वाद घालणारा अस्थायी कर्मचारी असून, शिपाई पदावर काम करतो. श्रीरामपूर येथून त्याची कोतुळ येथे बदली झाली. गेल्या दोन वर्षांपासून कोतुळ ग्रामीण रुग्णालयात तो सेवेत आहे. यापूर्वीही त्याचे अनेकांशी वाद झाल्याचे समजते. रुग्णालयाचे सामाजिक आरोग्य बिघडविणाऱ्या अशा वादग्रस्त कर्मचाऱ्याची बदली करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. 

रुग्णालयात अनेक पदे रिक्त 
कोतुळ ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्राचे कामकाज एकाच ठिकाणी चालते. येथे एकूण सहा वैद्यकीय अधिकाऱ्यांची आवश्‍यकता आहे. मात्र, प्राथमिक आरोग्य केंद्रातील दोन्ही पदे रिक्त आहेत. एका वैद्यकीय अधिकाऱ्याकडे प्राथमिक आरोग्य केंद्राचा प्रभारी पदभार आहे. ग्रामीण रुग्णालयातही चार पदे असताना, एकच वैद्यकीय अधिकारी आहेत.

संपादन : अशोक मुरुमकर

loading image
go to top