कामगार संघटनांच्या देशव्यापी बंदला काँग्रेसचा पाठिंबा

आनंद गायकवाड
Wednesday, 25 November 2020

केंद्रातील भाजपा सरकारने आणलेल्या नवीन कामगार व शेतकरी कायद्यांना सर्वच स्तरातून विरोध होत आहे.

संगमनेर (अहमदनगर) : केंद्रातील भाजपा सरकारने आणलेल्या नवीन कामगार व शेतकरी कायद्यांना सर्वच स्तरातून विरोध होत आहे. आता इंटकसह इतर कामगार संघटनाही मैदानात उतरल्या आहेत.

कामगार व शेतकरी कायद्यांना विरोध करण्यासाठी विविध कामगार संघटनांनी 26 नोव्हेंबरला पुकारलेल्या देशव्यापी बंदला काँग्रेस पक्षाचा पाठिंबा असल्याचे प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.

मुंबई येथे बोलतांना थोरात म्हणाले, कामगारांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु आणि इंदिरा गांधी यांनी 44 कामगार कायदे बनविले. परंतु केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने संसदेत अगर इतर कोणाशीही चर्चा न करता आणलेले कायदे कामगारांना देशोधडीला लावणारे तसेच बड्या उद्योगपतींचे गुलाम बनवणारे आहेत. काही निवडक उद्योगपतींच्या हितासाठी कामगारांना उध्वस्त करण्याचा मोदी सरकारचा डाव आहे. त्यांचा हा डाव हाणून पाडण्यासाठी कामगार संघटनांनी पुकारलेल्या देशव्यापी बंदला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचा पूर्ण पाठिंबा आहे. 

शेतकरी व कामगार विरोधी जुलमी कायद्याविरोधात काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणात आंदोलने करुन तीव्र विरोध दर्शवला. या कायद्यांमुळे कामगार चळवळींचे अस्तित्वच संपुष्टात येणार आहे. काँग्रेस पक्षाने शेतकरी आणि कामगार हित लक्षात घेऊन रस्त्यावर उतरून संघर्ष केला. कामगार संघटनांच्या या आंदोलनात आम्ही सर्वशक्तीनिशी त्यांच्या पाठीशी उभे आहोत असेही थोरात म्हणाले.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress backed nationwide strike of trade unions