काँग्रेसची दहा हजार गावांत शेतकरी बचाव व्हर्च्युअल रॅली

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 13 October 2020

महाराष्ट्र कॉंग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील, सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण, आदिवासी विकासमंत्री के. सी. पडवी, कॉंग्रेसचे सचिव व गुजरातचे प्रभारी खासदार राजीव सातव, महाराष्ट्राचे सहप्रभारी बी. एम. संदीप आदी उपस्थित राहणार आहेत.

संगमनेर ः केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरुद्ध गुरुवार (ता.15) दुपारी चार वाजता राज्यातील 10 हजार गावांत एकाच वेळी "शेतकरी बचाओ व्हर्च्युअल रॅली' काढण्यात येणार आहे.

रॅलीचे प्रक्षेपण सोशल मीडियातून 50 लाख शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्याचा प्रयत्न आहे. राज्यातील मुख्य कार्यक्रम संगमनेरला होणार असल्याची माहिती महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली. 

मंत्री थोरात म्हणाले, की केंद्र सरकारने लादलेल्या काळ्या कायद्यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसनेही विरोध दर्शविला आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत बैठक झाली.

भाजप सरकारने बहुमताच्या जोरावर लोकशाही व संसदेचे सर्व नियम पायदळी तुडवून, उद्योगपतींच्या फायद्यासाठी शेतकऱ्यांवर हे कायदे लादले आहेत. त्यामुळे देशातील शेतकरी उद्धवस्त होणार आहे.

शेतकऱ्यांना उद्योगपतींचे गुलाम बनविण्याचा हा डाव आहे. त्याविरोधात राज्यातील पाच ठिकाणी रॅलीच्या प्रमुख कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. संगमनेरात 15 ऑक्‍टोबर रोजी मुख्य कार्यक्रम होणार आहे.

महाराष्ट्र कॉंग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील, सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण, आदिवासी विकासमंत्री के. सी. पडवी, कॉंग्रेसचे सचिव व गुजरातचे प्रभारी खासदार राजीव सातव, महाराष्ट्राचे सहप्रभारी बी. एम. संदीप आदी उपस्थित राहणार आहेत.

पाच वेगवेगळ्या ठिकाणांहून कॉंग्रेस नेते राज्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधणार असल्याचे थोरात यांनी सांगितले. 
दरम्यान, भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचा 2020-21चा गळीत हंगामाचा प्रारंभही गुरुवारी (ता.15) सकाळी साडेदहा वाजता होणार असल्याचे कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ यांनी सांगितले. 

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress virtual rallies in ten thousand villages