पुणे- नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे 15 दिवसांत न बुजवल्यास काँग्रेस रस्त्यावर उतरणार

आनंद गायकवाड
Sunday, 13 September 2020

संगमनेर तालुक्याच्या हद्दीतून जाणाऱ्या नाशिक पुणे राष्ट्रीय महामार्गावर पावसामुळे असंख्य खड्डे पडले असून, अपघाताला निमंत्रण देणारे हे खड्डे येत्या 15 दिवसात दुरुस्त न केल्यास, टोलबंद आंदोलन करण्याचा इशारा युवक काँग्रेस व एनएसयुआयच्या कार्यकर्त्यांनी संबंधित ठेकेदार कंपनीला निवेदनाद्वारे दिला आहे.

संगमनेर (अहमदनगर) : संगमनेर तालुक्याच्या हद्दीतून जाणाऱ्या नाशिक पुणे राष्ट्रीय महामार्गावर पावसामुळे असंख्य खड्डे पडले असून, अपघाताला निमंत्रण देणारे हे खड्डे येत्या 15 दिवसात दुरुस्त न केल्यास, टोलबंद आंदोलन करण्याचा इशारा युवक काँग्रेस व एनएसयुआयच्या कार्यकर्त्यांनी संबंधित ठेकेदार कंपनीला निवेदनाद्वारे दिला आहे.

आयएलएफएस या टोल कंपनीच्या तालुक्यातील हिवरगाव पावसा टोलनाक्यावरील व्यवस्थापकाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, वाहतुकीची मोठी घनता असलेल्या पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गाची पावसामुळे दुरवस्था झाली असून, या मार्गावरील कऱ्हे घाट ते आळे खिंड या रस्त्यावर पावसामुळे अनेक खड्डे पडले आहेत. त्यात साचलेल्या पावसाच्या पाण्यामुळे वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत असल्याने, खड्डे चुकविण्याच्या नादात अपघाताची शक्यता आहे.

या मार्गावरील प्रवासासाठी भरभक्कम टोल घेणाऱ्या संबंधित व्यवस्थापनाची प्रवाशांना चांगले रस्ते देण्याची जबाबदारी आहे. या सर्व परिस्थितीचा विचार करता हे खड्डे बुजवून आगामी 15 दिवसांच्या आत महामार्गाची डागडुजी न केल्यास, 25 सप्टेंबर 2020 रोजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली व महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वाखाली टोल बंद आंदोलन करण्यात येणार आहे.

यावेळी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सोमेश्वर दिवटे, एनएसयुआयचे जिल्हाध्यक्ष निखील पापडेजा, तालुकाध्यक्ष गौरव डोंगरे, युवक काँग्रेसचे अध्यक्ष आनंद वर्पे, रमेश गुंजाळ, विजय राहणे, संतोष मांडेकर, हर्षल रहाणे आदी उपस्थित होते.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress warns of agitation for Nashik Pune highway