esakal | खाद्यतेलांची आयात मंदावली; पेट्रोल- डिझेलपाठोपाठ ग्राहकांवर नवा भार
sakal

बोलून बातमी शोधा

Consumers dissatisfied with rising edible oil prices

कोरोना संकटात महागाईचा भडका उडाला असून, पेट्रोल- डिझेलपाठोपाठ आता खाद्यतेलांचेही दर वाढले आहेत. यामुळे सामान्यांचे जीवन आणखी खडतर होऊ पाहत आहे.

खाद्यतेलांची आयात मंदावली; पेट्रोल- डिझेलपाठोपाठ ग्राहकांवर नवा भार

sakal_logo
By
गौरव साळुंके

श्रीरामपूर (अहमदनगर) : कोरोना संकटात महागाईचा भडका उडाला असून, पेट्रोल- डिझेलपाठोपाठ आता खाद्यतेलांचेही दर वाढले आहेत. यामुळे सामान्यांचे जीवन आणखी खडतर होऊ पाहत आहे. 

लॉकडाउनमुळे व्यवसायांची घडी विस्कळित झाल्याने परदेशी खाद्यतेलांची आयात मंदावली आहे. देशभरात महिन्याला सरासरी दोन लाख टन खाद्यतेल लागते. स्थानिक उत्पादनासह युक्रेन, मलेशिया, अर्जेंटिना आदी प्रमुख देशांतून सूर्यफूल, सोयाबीनसह पामतेलाची आयात होते. यंदा परदेशातील सूर्यफूल तेलाचे उत्पादन घटल्याने सोयाबीन तेलाला मागणी वाढली. त्यात कोरोनामुळे परदेश व्यापार विस्कळित झाल्याने दर कडाडले आहेत. 

गेल्या काही दिवसांत सोयाबीन, सूर्यफूल, शेंगदाणा, सरकीसह पामतेल यांच्या दरात दहा टक्के वाढ झाल्याची माहिती येथील रामदेव रिफायनरीचे संचालक मुकेश न्याती यांनी दिली. 

सोयाबीन तेलाचा किरकोळ बाजारातील दर सध्या प्रतिकिलो 112 रुपये, तर 15 लिटरच्या डब्याचा दर एक हजार 500 रुपये आहे. दहा दिवसांपूर्वी प्रतिकिलो 95 रुपयांनी मिळणाऱ्या खाद्यतेलासाठी आता 110 रुपये मोजावे लागतात. चांगल्या आरोग्यासाठी सूर्यफूल, शेंगदाणा, सोयाबीन तेल फायदेशीर ठरते. शहर परिसरात शंभराहून अधिक वडा-पाव स्टॉल, तसेच नाश्‍ता सेंटर आहेत. तेलांचे दर वाढल्याने खाद्यपदार्थांसाठीही अधिक पैसे मोजावे लागत आहेत. 

सण-उत्सवांत खाद्यतेलांचा खप वाढतो. आगामी काळातील नवरात्र, दिवाळी आदी सण-उत्सव लक्षात घेता, दर आणखी वाढण्याची शक्‍यता मुकेश न्याती यांनी वर्तविली. 
 

  • झालेली दरवाढ 
  • खाद्यतेल दर (प्रतिकिलो) वाढ 
  • सोयाबीन 112 रुपये 12 रुपये 
  • शेंगदाणा 150 रुपये दहा रुपये 
  • सूर्यफूल 138 रुपये 20 रुपये 
  • करडई 140 रुपये दहा रुपये 
  • सरकी 125 रुपये आठ रुपये 
  • पामतेल 100 रुपये सात रुपये 

संपादन : अशोक मुरुमकर