ग्राहकांच्या मीटर रीडिंगमध्ये विसंगती; वीज वितरणच्या अनागोंदी कारभारामुळे ग्राहक त्रस्त

आनंद गायकवाड
Saturday, 5 December 2020

वीजवितरणच्या अनागोंदी कारभारामुळे ग्राहक त्रस्त आहेत.

संगमनेर (अहमदनगर) : वीजवितरणच्या अनागोंदी कारभारामुळे ग्राहक त्रस्त आहेत. त्यामुळे ग्राहकांच्या तक्रारींत वाढ झाल्याचा आरोप उत्तर नगर जिल्हा व्यापारी जिल्हाध्यक्ष शिरीष मुळे यांनी केला. 

याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, की वीजवितरणच्या संगमनेर कार्यालयाकडून घेतलेल्या अधिकृत माहितीवरून, वीजग्राहकांना मिळणाऱ्या सेवा-सुविधांत वर्षभरात फरक पडला आहे. पूर्वीच्या तुलनेत वीजपुरवठा विस्कळित होणे, ग्राहकांच्या मीटर रीडिंगमधील विसंगती व त्यामुळे आलेल्या वाढीव बिलाच्या तक्रारी वाढत आहेत. नवीन घरगुती व वाणिज्यक वीजजोडणीसाठी मीटर शिल्लक नसल्याचे ठेवणीतील उत्तर संबंधित विभागाकडून दिले जाते. 

नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
कागदोपत्री, कायदेशीर सर्व प्रक्रिया पूर्ण करूनही मीटरअभावी वीजजोड मिळत नाहीत. त्यासाठी अनेकदा दोन महिने प्रतीक्षा करावी लागते. वर्षभरात नादुरुस्त झालेले मीटरही बदलून मिळाले नाहीत. वीजवितरणच्या या अनागोंदी कारभाराचा फटका सर्वसामान्य ग्राहकांना बसत आहे. वर्षभरात संगमनेर विभागात वीज मीटरचा तुटवडा असल्याची कबुली अधिकारी खासगीत देतात.

या मीटरचा पुरवठा करणाऱ्या येथील विभागीय कार्यालयाकडे चौकशी केली असता, अधीक्षक अभियंत्यांनी, संगमनेर कार्यालयातून माहिती घेतो, असे सांगितले. नवीन मीटरचा पुरवठा व नादुरुस्त मीटर लवकर बदलून न मिळाल्यास भाजपतर्फे वितरण कार्यालयात ठिय्या आंदोलनाचा इशारा संगमनेर भाजपतर्फे देण्यात आला आहे. 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Consumers suffer due to chaotic distribution of electricity