ठेकेदार, अधिकाऱ्यांनी काय ‘दिवे’ लावले? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महापालिका : पथदिव्यांवरून बैठकीत घुलेंकडून खरडपट्टी

ठेकेदार, अधिकाऱ्यांनी काय ‘दिवे’ लावले?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर : गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या, शहरातील पथदिव्यांचा प्रकाश अजून काही पडेना. आज स्थायी समितीचे सभापती अविनाश घुले यांनी अधिकारी व संबंधित ठेकेदारांची बैठक घेऊन चांगलीच खरडपट्टी काढली. कोणी किती ‘दिवे’ लावले, याचा आढावा घेतला. अहमदनगर शहरात २५ हजार एलईडी दिवे बसविण्याचा ठेका दिला, मात्र अजूनही शहरात सर्वत्र बसविण्यात आले नाहीत. याबाबत महापालिकेत आज बैठक घेण्यात आली. स्थायीचे सभापती घुले यांच्यासह विरोधी पक्षनेते संपत बारस्कर, नगरसेवक डॉ. सागर बोरुडे, माजी नगरसेवक निखिल वारे, संजय चोपडा, अतिरिक्त आयुक्त प्रदीप पठारे, उपायुक्त राऊत, विद्युत विभागप्रमुख वैभव जोशी बैठकीला उपस्थित होते.

हेही वाचा: नरेंद्र मोदी यांनी देशाची माफी मागावी : पृथ्वीराज चव्हाण यांची मागणी

ठेकेदार एजन्सीचे सोमवंशी यांनी बैठकीत दिलेल्या माहितीने समाधान न झाल्याने संपत बारस्कर आणि निखिल वारे यांनी अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती करीत धारेवर धरले. एलईडी ठेका घेण्यापूर्वी दिलेल्या प्रात्यक्षिकांमध्ये ६० वॉटचे दिवे लावून दाखविले. त्याचा लख्ख प्रकाश पडल्याने ठेका दिला. प्रत्यक्षात मात्र ३० वॉटचे दिवे लावले जात आहेत. ही नगरकरांची फसवणूक असून, यासंदर्भात महासभा घ्यावी. त्यात निर्णय घ्यावा, अशी सूचना संपत बारस्कर यांनी केली. निखिल वारे यांनी, सरसकट ६० वॉटचे दिवे लावावेत, अशी सूचना केली.

वीस दिवसांत केवळ २५० दिवे

२८ ऑक्टोबरला एलईडी दिवे बसविण्यास सुरवात करण्यात आली. वीस दिवसांत ठेकेदाराने २५० एलईडी दिवे बसविले. मात्र, त्यांचा उजेड पडत नसल्याच्या तक्रारी आल्याने, स्थायी समितीच्या सभेत जास्त वॉटचे दिवे लावण्याचा निर्णय झाला. प्रशासनाने त्यावर काहीच कार्यवाही न केल्याने सभापती घुले यांनी नाराजी व्यक्त करीत प्रशासनाला जाब विचारला.

loading image
go to top