कोरोनाने शेततळ्यांचाही निधी खाल्ला

सूर्यकांत नेटके
Sunday, 10 May 2020

सरकारने या योजनेच्या कामाला ब्रेक लावला आहे. यंदाच्या वर्षात अर्थसंकल्पीय निधीत केवळ 33 टक्केच निधी उपलब्ध होण्याची शक्यता वित्त तसेच रोजगार हमी योजना व जलसंधारण विभागाने कृषी विभागाकडे व्यक्त करत त्यानुसार नियोजन करण्याचे सूचित केले.

नगर : कोरोनाचा फटका औद्योगिक क्षेत्राला बसला आहे. शेतकऱ्यांचेही मोठे नुकसान या कोरोना व्हायरसने केले. आता तो शेततळ्याच्या मागे लागला आहे. शेतकऱ्यांना नवीन शेततळी खोदता येणार नाहीत.

राज्यात राबवण्यात येत असलेल्या मागेल त्याला शेततळे योजनेला यंदाच्या नव्या वर्षात सरकारने ब्रेक दिला आहे. यंदाच्या वर्षात अर्थसंकल्पीय निधीत केवळ 33 टक्केच निधी उपलब्ध होण्याची शक्यतारोजगार हमी योजना व जलसंधारण विभागाने व्यक्त केली आहे. त्यामुळे नव्या वर्षात मागेल त्याला शेततळे योजनेतून नवीन कामे सुरु करु नयेत व नवीन शेततळ्याची आखणी करुन देऊ नये असे आदेश कृषी आयुक्तांनी राज्यातील सर्व जिल्हा अधिक्षक कृषी अधिकाऱयांना दिले आहेत. 

हेही वाचा - शेततळ्यात पोहोयला गेला नि बुडाला

राज्यातील बहूतांश भागाला मागील काळात दुष्काळाचा फटका बसला. त्यामुळे दुष्काळी भागात पाणी साठवण करुन कमी पाण्यात शेतपीके घेण्यासाठी राज्यात मागेल त्याला शेततळे योजना राबवली जात आहे. त्यासाठी कृषी विभागाकडून अनुदान दिले जात असल्याने दरवर्षी राज्यभरातील साधारण पन्नास हजार शेतकरी या योजनेतुन शेततळे करण्यासाठी अनुदान मागणी करतात. यंदा मात्र राज्यात कोरोनाचे संकट आले आणि त्याचा पहिला फटका कृषी विभागाच्या मागेल त्याला शेततळे योजनेला बसला असल्याचे दिसत आहे.

सरकारने या योजनेच्या कामाला ब्रेक लावला आहे. 
यंदाच्या वर्षात अर्थसंकल्पीय निधीत केवळ 33 टक्केच निधी उपलब्ध होण्याची शक्यता वित्त तसेच रोजगार हमी योजना व जलसंधारण विभागाने कृषी विभागाकडे व्यक्त करत त्यानुसार नियोजन करण्याचे सूचित केले. त्यानुसार कृषी आयुक्तांनी बुधवारी (ता. 6) राज्यातील सर्व जिल्हा अधिक्षक कृषी अधिकाऱयांना पत्र देउन मागेल त्याला शेततळे जनेतून नवीन कामे सुरु करु नयेत, नवीन कामाची आखणी करुन देऊ नये असे पत्र दिले आहे. त्यामुळे यंदाच्या  वर्षात शेततळ्याची कामे होण्याची शक्यता नाही हे स्पष्ट झाले आहे.

नगर जिल्ह्याचा विचार करता आतापर्यत 55 हजार 920 शेतकऱयांनी शेततळ्याची मागणी केली असून त्यातील 45 हजार 955 शेतकरी योजनेला पात्र आहेत. 34 हजार 434 शेतकऱयांच्या कांमांना मंजुरी दिली आहे. 24 हजार शेतकरय़ांना कार्यारंभ आदेश दिलेले आहेत. त्यातील पंधरा हजार 721 कामे झालेली असून उर्वरित शेतकऱयांना आता प्रतिक्षा करावी लागणार आहे. 

मागेल त्याला शेततळे योजना दुष्काळी भागासाठी मोठा आधार देणारी योजना आहे. मागील दुष्काळाचा ज्या भागाला फटका बसला त्या भागात अनेक शेतकरी शेततळ्यामुळे शेतकरी तरले. आता शेततळ्याची योजना बंद झाली तर दुष्काळी भागातील शेतकऱयांना फटका बसेल. कोरोनामुळे आर्थिक संकट आले असले तरी शेतीला आधार देणारया योजना बंद करु नयेत. 
- रमेश कचरे, स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते, पाडळी ता. पाथर्डी, जि. नगर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona also ate farm funds