esakal | कोरोनाचे नगरला दोन मोठे हदरे 

बोलून बातमी शोधा

corona20202

रुग्णांची संख्या नऊने वाढल्याने जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या 113 झाली असून यातील 58 जणांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. तर 11 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 44 रुग्णांवर सध्या उपाचार सुरू आहेत. 

कोरोनाचे नगरला दोन मोठे हदरे 
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नगर : जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्ण सापडण्याचा सिलसिला आता थांबण्याचे नाव घेत नसल्याचे दिसून येत आहे. आज सकाळीच जिल्ह्यातील 9 रुग्ण कोरोना बाधित असल्याचे आढळून आले आहे. तर दोन जुळ्या मुलांना जन्म देणारी कोरोना बाधित महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या महिलेचा मृत्यू नेमका कशाने झाला हे मात्र अजून स्पष्ट झालेले नाही. गेली आठवड्या भरापासून कोरोना बाधितांची संख्या झपाटण्याने वाढत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाची चिंता वाढली आहे. 

जिल्ह्यातील कोरोना संशयितांचे अहवाल आज सकाळी जिल्हा रुग्णालयाला प्राप्त झाले. यात चार पुरुष, चार महिला व चार वर्षीय मुलीचा समावेश आहे. रुग्णांची संख्या नऊने वाढल्याने जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या 113 झाली असून यातील 58 जणांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. तर 11 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 44 रुग्णांवर सध्या उपाचार सुरू आहेत. 

कोरोना बाधित असलेली एक गर्भवती महिला घाटकोपरमधून निंबळक (ता. नगर) येथे आली होती. तिला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. तिचे सिझेरिअन करण्यात आले होते. तिच्यात न्युमेटिक लक्षणे आढळून आल्याने तिला विशेष दक्षता विभागात ठेवण्यात आले होते. तिने दोन बाळांना जन्म दिला. त्यातील एक मुलगा तर एक मुलगी आहे. या महिलेचा आज सकाळी मृत्यू झाला आहे. नवजात बालके मात्र सुखरूप आहेत. या घटनेमुळे निंबळक परिसरात शोकाकुल वातावरण आहे. 

आज जिल्हा रुग्णालयाला 60 कोरोना बाधितांचे अहवाल प्राप्त झाले. त्यात 51 निगेटिव्ह तर नऊ पॉझिटिव्ह आहेत. पॉझिटिव्ह पैकी घाटकोपरहून पिंपळगाव खांड (ता. अकोले) येथे आलेला एक जण, ठाणे येथून हिवरे कोरडा (ता. पारनेर) येथे आलेला एक, चाकण (जि. पुणे) येथून ढोर जळगाव शेवगाव येथे आलेला एक, तर संगमनेरमधील दोन, निमगाव (ता. राहाता) चार रुग्णांचा समावेश आहे. 

निमगाव येथील व्यक्‍ती यापूर्वीच्या बाधित व्यक्‍तीच्या संपर्कातील आहेत. बाधित रुग्णात वडील व मुलगी यांचा समावेश आहे. संगमनेर येथील 40 वर्षीय महिला रुग्णाला आजाराची लक्षणे जाणवत असल्याने संगमनेरच्या ग्रामीण रुग्णालयाने जिल्हा रुग्णालयात पाठवले होते. दुसरा रुग्ण हा 55 वर्षीय पुरुष आहे. त्यांना श्‍वसनाचा त्रास होऊ लागल्याने खासगी रुग्णालयाने जिल्हा रुग्णालयाकडे पाठविले होते. घाटकोपर येथून पिंपळगाव खांड येथे आलेली महिला यापूर्वीच्या बाधित रुग्णाच्या संपर्कातील आहे. चाकण (जि. पुणे) येथून ढोर जळगाव येथे आलेला 30 वर्षीय युवक बाधित आहे.